मुंबई किनारा मार्ग २०२४ च्या मध्यापर्यंत कार्यान्वित
मुंबई, दि. 25 (मिलिंद लिमये): मुंबईच्या किनारपट्टीवर समुद्रात भर घालून तयार करण्यात येणारा किनारा मार्ग पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता असून साडे दहा किलोमीटरच्या या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना टोल आकारणी होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
मुंबईत पश्चिम भागात होणारी मोठी वाहतूक कोंडी लक्षात घेता या किनारा मार्गाची आखणी मुंबई महानगरपालिकेने केली असून मरीन लाइन्स ते कांदिवली असे त्याचे मूळ स्वरूप आहे, त्यातील मरीन लाइन्स ते वरळी दरम्यानच्या साडे दहा किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम सुमारे सत्तर टक्के पूर्ण झाले असून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत तो कार्यान्वित करण्याचे लक्ष असले तरी प्रत्यक्षात त्यासाठी २०२४ चा मध्य उजाडेल असे चित्र आहे.
या मार्गाच्या कामाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्यात कामाची प्रगती पाहायला मिळाली असून अत्यंत वेगाने आणि कुशलतेने हे काम सुरू असल्याचे दिसून आले आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला मार्गाचे मुख्य अभियंता मंथय्या स्वामी यांनी कामाची माहिती दिली, त्यानुसार बोगदा खनन ९१ टक्के , भराव काम ९३ टक्के पूर्ण झाली असून बाकी कामे नियोजित वेळेत पूर्ण होतील असे ते म्हणाले.
या पहिल्या टप्प्यातील मार्गात प्रत्येकी चार पदर असून एकूण रस्ता आठ पदरी असणार आहे, बोगद्यात मात्र सहा पदरी असेल , त्यातील एक पदर हा बस आणि रुग्णवाहिका यांच्यासाठी राखीव आहे, दोन ठिकाणी सागरी पुलांची निर्मिती होते आहे तर चार किलोमीटर रस्ता भूमिगत आहे. या रस्त्याला १६ ठिकाणी भूमिगत पादचारी मार्ग असून चार वाहनतळ , साडेसात किमी चा नवीन पदपथ आणि तीन ठिकाणी वाहतूक आंतरबदल करणारे पुलमार्ग आहेत.
मूळ जमिनीपासून सरासरी ९० मीटर इतका भराव समुद्रात टाकून हा नवीन मार्ग तयार करण्यात येत आहे, अमरसनस् या ठिकाणी हा भराव तब्बल १७५ मीटर इतका आहे. नवी मुंबई विमानतळासाठी फोडण्यात आलेल्या टेकड्यांची माती, दगड आदींनी हा भराव पूर्ण करण्यात आला आहे. अमरसन्स, हाजी अली आणि वरळी याठिकाणी मुख्य रस्त्यावरील वाहतूक या रस्त्यावर येण्यासाठी आंतरबदल पूल बांधण्यात आले असून हाजी अली येथे अशा बांधलेल्या एका पुलाची उंची तब्बल तीस मीटर इतकी आहे.
सध्या हा मार्ग मरीन लाइन्स उड्डाण पूल इथे सुरू होऊन तो वरळी सी लिंक वर जोडला जाणार आहे. त्यामुळे गिरगाव चौपाटी आणि मलबार हिल खालून बोगदे खणण्यात आले असून त्यासाठी बांधलेल्या उतार चढाव धरून ही लांबी चार किमी इतकी आहे. हा बोगदा खणण्यासाठी ११ मीटर व्यासाचे मशीन काम करीत होते. सध्या हे ९१ टक्के पूर्ण झाले आहे. या बोगद्यावर एके प्रियदर्शनी पार्क इथे तीन मजली इमारत उभारण्यात येत असून त्यातून या रस्त्याचे वाहतूक नियंत्रण करण्यात येणार आहे. याशिवाय दक्षिण बाजूलाही असे नियंत्रण कक्ष उभारण्यात येत आहे.Executed until the middle of the Mumbai Coast Road 1
रस्त्याला कोणताही टोल सध्या प्रस्तावित नसून ताशी ऐशी किमी वेगाने वाहने यावर धावू शकतील , यात कोणतीही सिग्नल यंत्रणा नाही त्यामुळे वाहतूक खोळंबा होणार नाही, पावसाचे पाणी वाहून जाण्याची ,अपघात झाल्यास त्वरित हालचाली सुरू केल्या जातील अशी व्यवस्था आहे. सकार्डो पद्धतीची वायू विजन करण्याची नवीन प्रणाली विकसित करण्यात आली असून त्यामुळे ज्या दिशेने वाहन जात आहे त्या दिशेने हवेचे झोत आत सोडले जातील. त्याचबरोबर एकल पद्धतीचे खांब समुद्रात उभारून त्यावर पुलांची बांधणी होत आहे, हे तंत्रज्ञान प्रथमच भारतात वापरले जात आहे.
या रस्त्याच्या कामात सुमारे ७० हेक्टर जागेवर हरित्क्षेत्र निर्माण केले जात असून त्यात जैव विविधता उद्याने, सायकल, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह , वाहनतळ यांचा समावेश आहे तर हाजी अली ते वरळी असा साडेसात किमीचा नवीन समुद्र किनारा तयार होत असून त्याची रुंदी वीस मीटर इतकी आहे, ते प्रति मरीन ड्राईव्ह असणार आहे.एकूण १११ हेक्टर क्षेत्रावर भराव टाकून साडेसात किमीची सागरी तटरक्षक भिंत बांधली जात आहे, याशिवाय प्रियदर्शिनी पार्क आणि वरळी इथे तटरक्षक दलासाठी दोन जेट्टी देखील उभारण्यात आल्या आहेत. मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा आणि स्थानिक तसेच परदेशी पर्यटकांना आकर्षित करणारा हा मार्ग लवकर सेवेत येण्याची वाट मुंबईकर पाहत आहेत.
ML/KA/PGB
25 Feb. 2023