ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का?चर्चांना उधाण
ठाणे, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेतील फुटीनंतर अनेक मोठ्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून आता ठाण्यातील राष्ट्रवादीचा एक मोठा नेता शिंदे गटात प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे.Big blow to NCP in Thane?
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे एके काळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र जर तसं झालं तर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल.
नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात बॅनर लागले आहेत. नजीब मुल्ला यांचा वाढदिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून लावलं जाणं अपेक्षित होतं. पण याउलट शिंदे गटाने ह बॅनर्स लावले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटाच्या बॅनर्सवर नजीब मुल्ला यांचा फोटो असल्याने ठाण्यात राजकीय चर्चा रंगली आहे.
बॅनरवरुन नजीब मुल्ला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसंच या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो आहेत.मधल्या काळात मुल्ला आणि आव्हाड यांच्यात चांगलेच बिनसले होते त्यामुळे मुल्ला यांना हाताशी धरून आव्हाड यांना शह देण्याचा प्रयत्न शिंदे गट करीत असल्याची चर्चा आहे.
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने तिथे पक्षाला आणखी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नजीब मुल्ला यांची मुंब्र्यात चांगली पकड असून जर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास मोठा फायदा होईल. दरम्यान आगामी दिवसात मुंब्र्यातील काही नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ML/KA/PGB
20 Jan. 2023