बांगलादेशकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सलमान (नाबाद ९१) आणि आबिद (७६) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर अंधांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर १०२ धावांनी मोठा विजय नोंदवला.
कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखाना (एमसीए) येथे झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार मोहम्मद अशिकूर रहमान (४) लवकर माघारी परतला. यानंतर सलमान (५८ चेंडूंत ९१ धावा ) आणि आबिद (३९ चेंडूंत ७६ धावा ) यांनी संघाच्या दुसऱ्या गड्यासाठी १४२ धावांची भागीदारी रचली. त्यांच्या या कामगिरीमुळे संघाने निर्धारित २० षटकात ३ बाद २२५ धावसंख्येपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून ब्रेवर नेडने दोन विकेट्स मिळवले.
आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही. वॅलेस लाचलं (२०) आणि कर्णधार मॅककार्थी मॅट (१७) वगळता कोणालाही फलंदाजीत चुणूक दाखवता आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला १९.४ षटकांत १२३ धावाच करता आल्या.
बांगलादेशकडून सलमान (२/१६) आणि तांझील (२/२९) यांनी गोलंदाजीत चमक दाखवली. सलमानने केलेल्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. या सामन्याकरता माजी महापौर किशोरी पेडणेकर, ‘एमसीए’चे माजी पदाधिकारी जगदीश आचरेकर, नदीम मेमन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.Bangladesh beat Australia
ML/KA/PGB
11Dec .2022