ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्याजवळ उभारले फुलपाखरू उद्यान
चंद्रपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर जिल्हा म्हणजे वाघांचा जिल्हा, देश व जगभरातून व्याघ्रप्रेमी चंद्रपूर जिल्ह्यात हा रुबाबदार वन्यजीव बघण्यासाठी येतात. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात केवळ वाघ एवढाच दर्शनाचा विषय नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाचे वैविध्य व फुलपाखरांची विविधरंगी दर्शन एक वेगळा अभ्यासाचा व अनुभवण्याचा विषय आहे.
हेच लक्षात ठेवून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांना निसर्गाची ही बाजू देखील कळावी यासाठी आगरझरी गावालगत फुलपाखरू उद्यान विकसित करण्यात आले आहे. नुकतेच या उद्यानाचे नूतनीकरण कार्य पूर्ण झाले. एकीकडे फुलपाखरांसाठी आवश्यक फुलझाडांची लागवड, रमणीय जंगल परिसर, कारंजी, मुलांसाठी विविध खेळ प्रकार यासह एक दिवस घालवण्यासाठी आवश्यक असलेली नीरव शांतता देखील इथे अनुभवता येते.
अगदी लक्ष्मण झुला असो वा फुलपाखरांचे एनक्लोजर या सर्व बाबींमुळे आगरझरी येथील फुलपाखरू उद्यान पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरले आहे. या फुलपाखरू उद्यानाची संकल्पना याच गावातील नागरिकांना रोजगाराचे साधन देऊन गेली आहे. हे उद्यान व आसपास असणारे अनुषंगिक हॉटेल, गाईड, जिप्सी या सर्व सेवा स्थानिक लोक पुरवत आहेत. गावाच्या अर्थकारणावर फुलपाखरू उद्यानाचा मोठा प्रभाव जाणवतो आहे.Butterfly Park established near Tadoba-Andhari Tiger Reserve
तुम्हाला काही तास घालवायचे असतील किंवा एखादा दिवस तर या फुलपाखरू उद्यानात त्याची सोय निश्चितपणे केलेली आहे. एकीकडे या उद्यानालगत साहसिक खेळ प्रकाराचे दालन विकसित करण्यात येत आहे. तर उद्यानात लहान मुलांना मनसोक्त खेळता यावे अशी सोय करण्यात आली आहे. सोबतच मोठा कॅफेटेरिया देखील आहे. याशिवाय ज्यांना फुलपाखरांमध्ये अधिक रस आहे त्यांच्यासाठी परिचय केंद्रात या संदर्भातली माहिती आपण टिपून घेऊ शकता. फुलपाखरू उद्यानाच्या नूतनीकरणानंतर पर्यटकांचा ओघ उद्यानात वाढला आहे.
तेव्हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तीर्ण वन्यजीव अधिवासाची भेट घेणार असाल तर आगरझरी येथील फुलपाखरू उद्यानालाही जरूर भेट द्या. चंद्रपूर जिल्ह्यातील नैसर्गिक वैविध्याचे एक नवे दालन तुमची प्रतीक्षा करत आहे असे आवाहन वन विभागाने केले आहे.
ML/KA/PGB
29 Nov .2022