कोकण भवन येथे संविधान दिन उत्साहात साजरा
नवी मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन देशभर साजरा केला जातो.याच दिनाचे औचित्य साधून आज बेलापूर येथील कोकण भवनात मुंबई समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती मनीषा देवगुणे, सहाय्यक आयुक्त (प्रशासन), श्रीमती माधुरी डोंगरे, प्रभारी तहसीलदार, सामान्य प्रशासन, श्री. सोनावणे, सहाय्यक संचालक, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय, धर्मराज गोसावी, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, संजय भोसले, जनसंपर्क अधिकारी, विनोद जामनेकर, श्री. बाईत इत्यादी उपस्थित होते.Constitution Day celebrated with enthusiasm at Konkan Bhavan
शासनाच्या वतीने भारतीय संविधानातील नागरिकांचे मूलभूत कर्तव्य यावर लक्ष केंद्रित करून 26 नोव्हेंबर रोजी जागरूकता मोहीम राबविली जाते. या मोहिमे अंतर्गत संविधान दिनी प्रत्येक शासकीय कार्यालयात प्रास्ताविकेचे वाचन केले जाते. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आज सकाळी 11 वाजता भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रास्ताविकेच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविकेचे वाचन श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले.
यावेळी कोकण भवन येथील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 हा कालावधीत समतापर्व हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने मुंबई विभागात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण यांच्या अधिनस्त शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. संविधान दिनानिमित्त प्रभातफेरी, संविधान वाचन, व्याख्याने, जाती प्रमाणपत्र पडताळणी शिबीर, जेष्ठ नागरिक, तृतीय पंथी इत्यादी साठी विविध कार्यक्रम, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादीचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अशी माहिती यावेळी श्रीमती वंदना कोचुरे यांनी दिली.
ML/KA/PGB
26 Nov .2022