हनी ट्रॅपींगमध्ये शेतकऱ्याने गमावले ७० लाख

 हनी ट्रॅपींगमध्ये शेतकऱ्याने गमावले ७० लाख

अमरावती, दि. १३ : प्रेमाने गोड बोलून लोकांना लुबाडण्याचे म्हणजेच हनी ट्रॅपिंगचे प्रकार आता शहरांरोबर गावांतही येऊन पोहोचले आहे. अमरावती जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्यांला हनी ट्रॅप करून तब्बल ७० लाख रुपये लुबाडण्यात आले आहेत. केवळ 10 हजार रुपयांच्या एका साध्या मदतीपासून सुरू झालेला हा व्यवहार अखेर 70 लाखांच्या खंडणीवर जाऊन थांबला असून, या प्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित शेतकरी अमरावती येथील एका मोबाईल शॉपमध्ये नेहमी जात असत. तिथेच त्यांची ओळख दुकानदार पती-पत्नीशी झाली. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी महिलेच्या पतीने शेतकऱ्याकडून 10,000 रुपये उसने घेतले आणि महिनाभरात ते परतही केले. त्यानंतर पती दुकानात नसताना महिलेने शेतकऱ्याकडे 10,000 रुपये मागितले. हळूहळू महिलेने शेतकऱ्याला आपल्या भावनिक जाळ्यात ओढले. तुम्ही अजूनही तरुण दिसता, माझा पती माझ्याशी नीट वागत नाही, असे सांगून तिने जवळीक वाढवली. मार्च 2020 मध्ये या महिलेने 64 वर्षीय शेतकऱ्याला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढले. काही काळानंतर आपली चूक लक्षात आल्यावर जेव्हा शेतकऱ्याने हे संबंध तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या दाम्पत्याचा क्रूर चेहरा समोर आला. 30 नोव्हेंबर 2020 ते नोव्हेंबर 2024 या 4 वर्षांच्या काळात या दाम्पत्याने शेतकऱ्याला वारंवार धमकावून 70 लाख रुपये उकळले. अखेर धीर एकवटून शेतकऱ्याने नांदगाव पेठ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या लुटारू पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *