या दिवशी देशभरातील मेडिकल राहणार बंद
मुंबई, दि.१३ : देशभरातील औषधविक्रेते 20 मे रोजी देशव्यापी संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) ने हा निर्णय घेतला असून यात 12.4 लाखांहून अधिक औषधविक्रेते सहभागी होतील. संघटनेचे म्हणणे आहे की ई-फार्मसी प्लॅटफॉर्म नियमांतील त्रुटींचा गैरफायदा घेत आहेत, ज्यामुळे लहान फार्मसींच्या उपजीविकेवर परिणाम होत असून सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे. अंदाजे 5 कोटी लोकांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
AIOCD ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या निवेदनात असा आरोप केला आहे की, वारंवार मागणी करूनही सरकारने ठोस कारवाई केलेली नाही. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर योग्य पडताळणीशिवाय औषधे विकली जात असल्याने एकाच प्रिस्क्रिप्शनचा अनेकदा वापर होत आहे. एआय-आधारित बनावट प्रिस्क्रिप्शन हा गंभीर धोका असल्याचे त्यांनी सांगितले. अँटिबायोटिक्स आणि Habit Forming औषधांच्या अनियंत्रित विक्रीमुळे अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्ससारख्या समस्या वाढू शकतात, ज्याचा थेट परिणाम रुग्ण सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्यावर होतो.
संघटनेने मोठ्या सवलतींनाही प्रमुख समस्या म्हणून नमूद केले आहे. कॉर्पोरेट कंपन्या प्रचंड सवलती देऊन असमान स्पर्धा निर्माण करत असल्याने ग्रामीण व लहान शहरांतील केमिस्ट्स दबावाखाली आहेत. भविष्यात औषधांच्या स्थानिक पुरवठा प्रणालीवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारने मोठ्या सवलतींवर बंदी घालावी आणि सर्व व्यवसायांसाठी समान संधीचे धोरण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
AIOCD चे अध्यक्ष जे. एस. शिंदे आणि महासचिव राजीव सिंघल यांनी स्पष्ट केले की हा केवळ व्यावसायिक मुद्दा नसून रुग्ण सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यांनी इशारा दिला की, जर सरकारने 20 मेपर्यंत ठोस निर्णय घेतला नाही, तर संघटना अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू करू शकते.
SL/ML/SL