कांजूर प्रकल्पातून दुर्गंधी रोखण्यासाठी हरित पट्टा उभारणार!आयुक्त अश्विनी भिडे
मुंबई, दि १३: कांजूर येथील नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून दुर्गंधी निर्माण होऊ नये, यासाठी नागरी वस्ती आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पादरम्यान पर्यावरणीय हरित पट्टा विकसित करून प्रभावी बफर झोन उभारण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. दुर्गंधी नियंत्रणासाठी एन्झाइमयुक्त रसायनांची फवारणी वाढवणे, रिअल टाइम वायू गुणवत्ता निरीक्षण प्रणाली अधिक सक्षम करणे आणि रात्रीच्या वेळेत विशेष नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.
आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी कांजूरस्थित नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आकस्मिक भेट देत कचरा विलगीकरण केंद्र, खतनिर्मिती प्रकल्प, वायूपासून वीजनिर्मिती केंद्र तसेच बायो रिऍक्टर लँडफिलची पाहणी केली. यावेळी उपायुक्त प्रशांत गायकवाड, उपायुक्त किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कांजूर येथील सुमारे ११८.१४ हेक्टर क्षेत्रावरील प्रकल्पात दररोज सुमारे ५२०० मेट्रिक टन कचऱ्यावर बायोरिऍक्टर तंत्रज्ञानाद्वारे, तर १००० मेट्रिक टन कचऱ्यावर खतनिर्मिती प्रक्रियेद्वारे प्रक्रिया केली जाते. कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूपासून वीज निर्मिती केली जात असून ती प्रकल्पासाठी वापरण्यात येते. उर्वरित वायू शास्त्रोक्त पद्धतीने जाळण्यात येतो. दुर्गंधी रोखण्यासाठी कचऱ्यावर मातीचे आवरण टाकणे, एन्झाइमयुक्त रसायनांची फवारणी आणि ११ ठिकाणी ‘मिस्टींग कॅनन’द्वारे सुगंधी द्रव्याची फवारणी केली जात असल्याची माहिती पाहणीदरम्यान देण्यात आली.
परिसरातील नागरिकांकडून येणाऱ्या दुर्गंधीच्या तक्रारींसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या हेल्पलाईनचाही आयुक्तांनी आढावा घेतला. कचरा पुनर्वापर व पुनर्प्रक्रिया सुविधा बफर झोनमध्ये स्थलांतरित करण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करावा, तसेच सतत वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र, सार्वजनिक माहितीसाठी डिस्प्ले सुविधेसह उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या परिसरात हरित कुंपण उभारून नागरी वसाहती आणि कचरा क्षेत्र यांच्यामध्ये संरक्षणात्मक हरित पट्टा निर्माण करण्याची योजनाही तयार करण्यात येणार आहे.
…………………
देवनार वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रगती
देवनार क्षेपणभूमी येथे उभारण्यात येत असलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून बांधकाम आणि यंत्रणा उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पातून दररोज सुमारे ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून सुमारे ८ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. आयुक्त भिडे यांनी प्रकल्पस्थळी पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी त्यांनी वृक्षारोपणही केले. यानंतर त्यांनी देवनार बायोमायनिंग प्रकल्पाचाही आढावा घेतला. सुमारे १२० हेक्टर क्षेत्रावरील देवनार क्षेपणभूमीवर साचलेल्या १८५ लाख मेट्रिक टन जुन्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया सुरू असून त्यातून माती, पुनर्वापरयोग्य साहित्य आणि उर्वरित कचऱ्याची वैज्ञानिक विल्हेवाट लावण्यात येत आहे.
…………………………………
स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद
आयुक्त अश्विनी भिडे यांनी विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगरमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या चौकीलाही आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कामाचे वेळापत्रक, उपलब्ध सुविधा आणि साहित्य पुरवठ्याची माहिती घेतली. शहरातील रस्ते, चौक आणि परिसर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच कचरा साचणाऱ्या ठिकाणांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनजागृती वाढवावी, असे निर्देश त्यांनी दिले.KK/ML/MS