फेरीवाल्यांना अधिकृत करू नका शिवसेना (ठाकरे) पक्ष आक्रमक
मुंबई प्रतिनिधी : मुंबई उपनगरीय रेल्वेमधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येमुळे प्रवाशांच्या अडचणींमध्ये भर पडत असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. रेल्वे प्रशासन काही फेरीवाल्यांना ओळखपत्र देऊन अधिकृत करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर आधीच प्रचंड गर्दी असताना रेल्वे प्रशासनाकडून गर्दी नियोजनात अपयश येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत रेल्वे गाड्यांमध्ये फेरीवाल्यांचा वाढता वावर प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याचे शिवसेना ठाकरे पक्षाचे म्हणणे आहे.
रेल्वे प्रशासनाकडून काही फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र, ओळखपत्र देणे म्हणजे नियंत्रण नव्हे, तर गैरवापराला आमंत्रण असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. या ओळखपत्रांच्या आधारे अधिक फेरीवाले बेकायदेशीरपणे रेल्वे डब्यांमध्ये प्रवेश करतील आणि त्यांच्यावर कारवाई करणे अधिक कठीण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये गर्दीच्या वेळेतही फेरीवाले विविध वस्तूंची विक्री करत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः महिला डब्यांमध्ये चोरी, छेडछाड आणि मोबाईल-पाकीट चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक संवेदनशील बनला आहे.“प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायचे की फेरीवाल्यांना?” असा सवाल शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय पाटील यांनी उपस्थित केला आहे. विविध प्रवासी संघटनांनीदेखील फेरीवाल्यांना कोणत्याही परिस्थितीत अधिकृतता देऊ नये, अशी मागणी केली आहे.यासंदर्भात खासदार संजय पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री तसेच मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.