अमेरिकेने भारताला परत केल्या तस्करी झालेल्या 657 प्राचीन कलाकृती
वॉशिग्टन डीसी, दि. ३० : अमेरिकेने भारताला सुमारे 1.4 कोटी डॉलर किमतीच्या 657 प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. या कलाकृती तस्करी नेटवर्कद्वारे परदेशात पोहोचवण्यात आल्या होत्या, ज्या तपासानंतर जप्त करून परत करण्यात आल्या. मॅनहटन डिस्ट्रिक्ट ॲटर्नी एल्विन ब्रॅग यांनी मंगळवारी या कलाकृती परत करण्याची घोषणा केली. या सर्व कलाकृती आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्कच्या तपासादरम्यान जप्त करण्यात आल्या होत्या.
न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या कौन्सिलर राजलक्ष्मी कदम यांच्या उपस्थितीत कलाकृती परत करण्यात आल्या. भारताचे महावाणिज्य दूत बिनय प्रधान यांनी अमेरिकन एजन्सींच्या सहकार्याची प्रशंसा केली.परत केलेल्या वस्तूंमध्ये 20 लाख डॉलर किमतीची अवलोकितेश्वराची कांस्य प्रतिमा समाविष्ट आहे, जी छत्तीसगडमधील रायपूर येथील संग्रहालयातून चोरी झाली होती.
याव्यतिरिक्त, मध्य प्रदेशातील मंदिरातून चोरी झालेली नृत्य करणाऱ्या गणेशाची मूर्ती देखील समाविष्ट आहे.एक लाल वाळूच्या दगडाची बुद्ध प्रतिमा देखील परत करण्यात आली आहे, ज्याची किंमत सुमारे 75 लाख डॉलर सांगितली गेली. ही प्रतिमा देखील तस्करी करून अमेरिकेत पोहोचवण्यात आली होती.मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट ॲटर्नीच्या ॲन्टिक्विटीज ट्रॅफिकिंग युनिटने आतापर्यंत 6200 हून अधिक सांस्कृतिक वस्तू जप्त केल्या आहेत, ज्यांची एकूण किंमत 485 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे. यापैकी 5900 हून अधिक वस्तू 36 देशांना परत करण्यात आल्या आहेत.
SL/ ML/ SL