पुणे भाजपा व्यापारी आघाडीने दिले २४ तास व्यवसायासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन

 पुणे भाजपा व्यापारी आघाडीने दिले २४ तास व्यवसायासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन

पुणे प्रतिनिधी

पुणे शहरातील व्यापाऱ्यांकडून सातत्याने प्राप्त होत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, व्यापारी आघाडी – पुणे शहराचे अध्यक्ष महेश गुप्ता यांनी पुढाकार घेत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन सादर केले. व्यापाऱ्यांना कायदेशीररित्या २४ तास व्यवसाय करता यावा, यासाठी हे निवेदन देण्यात आले.

निवेदनात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नियमन) अधिनियम, २०१७ तसेच महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १ ऑक्टोबर २०२५ च्या परिपत्रकानुसार आवश्यक परवाने असलेल्या व कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्याचा अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र काही ठिकाणी स्थानिक स्तरावर अशा वैध आस्थापनांवर अनावश्यक निर्बंध लादले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला.

तसेच बॉम्बे उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही उल्लेख करत अशा प्रकारचे निर्बंध कायद्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या निवेदनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आल्या :

• कायदेशीर परवानाधारक आस्थापनांना २४ तास व्यवसाय करण्यास कोणताही अडथळा येऊ नये.
• पोलीस प्रशासनाकडून तोंडी अथवा बळजबरीचे निर्देश तात्काळ थांबवावेत.
• संपूर्ण पुणे शहरात एकसमान व कायदेशीर अंमलबजावणी सुनिश्चित करावी.
• व्यापाऱ्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावा.

यावेळी बोलताना महेश गुप्ता म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘Ease of Doing Business’ या संकल्पनेद्वारे देशात व्यवसाय सुलभ करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांना कायदेशीर व्यवसायासाठी अनुकूल वातावरण मिळणे आवश्यक आहे.”

ते पुढे म्हणाले की, व्यापारी वर्ग हा शहराच्या तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणे म्हणजे विकासाला चालना मिळणे होय. व्यापाऱ्यांच्या हक्कांवर कुठल्याही प्रकारे गदा येऊ देणार नाही.

भाजपा व्यापारी आघाडी – पुणे शहर ही व्यापारी वर्गाच्या प्रत्येक प्रश्नावर सक्रियपणे काम करत असून व्यापाऱ्यांना भीतीमुक्त वातावरणात व्यवसाय करता यावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *