अभिनेता ललित प्रभाकर साकारणार नामदेव ढसाळांची भूमिका
मुंबई, दि. १५ : मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता ललित प्रभाकर एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. दलित पँथरचे संस्थापक आणि प्रख्यात विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या चरित्रपटात ललित प्रभाकर मुख्य भूमिका साकारणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून, यामध्ये ललितचा नामदेव ढसाळ यांच्या रूपातील अतिशय प्रभावी आणि करारी लूक पाहायला मिळतोय.
हा चित्रपट 1 ऑक्टोबर 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदी भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे.
संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत व वरुणा मदनलाल राणा यांची निर्मिती असलेल्या या चरित्रपटातून दलित पँथर चळवळीचे प्रणेते आणि विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा ज्वलंत व संघर्षमय जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या चित्रपटाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा वरुणा राणा यांनी सांभाळली असून, चित्रपटाला जागतिक कीर्तीचे संगीतकार इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. विशेष म्हणजे, हिंदीतील दिग्गज गीतकार इर्शाद कामील आणि मराठीतील प्रसिद्ध कवी गुरु ठाकूर यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत.
SL/ML/SL