समाधानकारक दर मिळत नसल्याने 25 क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकले…
जालना दि २५ : जालना जिल्ह्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. बाजारात टोमॅटोला योग्य दर मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने आपले टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत. जालन्यातील धारकल्याण गावातील अमर काकडे या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली होती. यासाठी त्यांना सुमारे 40 ते 45 हजार रुपयांचा खर्च आला होता. त्यानंतर टोमॅटोचे पीक चांगले आले आणि उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले. मात्र विक्रीसाठी जालना तसेच छत्रपती संभाजीनगर येथील करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो नेल्यानंतर व्यापाऱ्यांनी केवळ 4 ते 5 रुपये प्रति किलो दराने टोमॅटो खरेदी करण्याची मागणी केली.
यामुळे बाजारात टोमॅटोला समाधानकारक भाव न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकरी अमर काकडे यांनी तब्बल 25 क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आपला संताप व्यक्त केला. शेतकऱ्याला टोमॅटो विक्रीतून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती, मात्र सध्या मिळणाऱ्या कवडीमोल दरामुळे केलेला खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत असून त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे.ML/ML/MS