माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा सन २०२६’चा निकाल जाहीर

 माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा सन २०२६’चा निकाल जाहीर

मुंबई, दि २४
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ५१ ठिकाणी आयोजित या स्पर्धेमध्ये ८६ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक २४ मार्च २०२६) घोषित केला.

महानगरपालिका मुख्यालयात पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेतून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी सविस्तर निकालाची घोषणा केली. याप्रसंगी उप महापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. किर्तीवर्धन किरीतकुडवे, कला अकादमीचे प्राचार्य श्री. दिनकर पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यंदा एकूण पाच गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेअंतर्गत इयत्ता पहिली व दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक १ करिता ३ विषय होते. यामध्ये ‘माझा चांदोमामा’, ‘माझी मनीमाऊ’, ‘मी माझ्या घरात’; इयत्ता तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक २ करिता ‘मी झाडावर चढतो’, ‘मी फुलांच्या बागेत’, ‘मी आईसोबत लाडू बनवितो’; इयत्ता पाचवी व सहावीतील विद्यार्थ्यांच्या गट क्रमांक ३ करिता ‘आम्ही जंगलात फिरतो’, ‘आम्ही परग्रहावर’, ‘आम्ही शिवरायांचे मावळे’, असे विषय होते. तर इयत्ता सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ४ करिता ‘आम्ही नदीच्या पाण्यात पोहतो’, ‘आमची वेषभूषा स्पर्धा’, ‘माझा आवडता मैदानी खेळ’, आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ५ करिता ‘पर्यावरण संवर्धन’, ‘माझी प्रगतिशील सुंदर मुंबई’, ‘गड संवर्धन’, असे विषय होते.

या स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या चित्रकृतींचे प्राथमिक, द्वितीय आणि नंतर अंतिम परीक्षण करुन विजेत्यांची यादी निश्चित करण्यात आली. अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून सर. ज. जी. कला महाविद्यालयाचे माजी विभाग प्रमुख श्री. अनिल नाईक, सुप्रसिद्ध ऍनिमेशन फिल्म डिझायनर श्री. धीमंत व्यास, नेहरू सेंटर आर्ट गॅलरीचे संचालक श्री. संतोष पेडणेकर यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेच्या निकालाचे परीक्षकांनी बंद करून दिलेले पाकीट आजच्या पत्रकार परिषदेत महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते उघडण्यात आले.
..

स्पर्धेचा निकाल-

गट क्रमांक एक (इयत्ता पहिली व दुसरी):- प्रथम क्रमांक ‘डी’ विभागातील लेडी इंजिनिअर हायस्कूलमधील इयत्ता दुसरीतील लेविन चलवादी, द्वितीय क्रमांक ‘ए’ विभागातील सेंट झेवियर हायस्कूल मधील इयत्ता दुसरीतील मायरा बरगे आणि तृतीय क्रमांक ‘एम पश्चिम’ विभागातील चेंबूर कर्नाटक हायस्कूलमधील इयत्ता पहिलीतील शौर्य भगत यांनी पटकाविला.

गट क्रमांक दोन (तिसरी व चौथी):- प्रथम क्रमांक ‘एस’ विभागातील गुरुनानक इंग्लिश प्रायमरी स्कूलमधील इयत्ता चौथीतील रिया विश्वकर्मा, द्वितीय क्रमांक ‘एस’ विभागातील पवई इंग्रजी हायस्कूलमधील इयत्ता तिसरीतील भावेश्री चंदनशिवे, तृतीय क्रमांक ‘जी उत्तर’ विभागातील धारावी काळा किल्ला मराठी शाळा क्रमांक दोनमधील इयत्ता तिसरीतील प्राची जैसवार यांनी पटकाविला.

गट क्रमांक ३ (पाचवी ते सहावी) :- प्रथम क्रमांक ‘एच पश्चिम’ विभागातील पाली चिंबई शाळेतील इयत्ता पाचवीतील माही जैसवाल, द्वितीय क्रमांक ‘ई’ विभागातील केनिया अँड अँकर इंग्लिश स्कूलमधील इयत्ता पाचवीतील योगिता चौहान आणि तृतीय क्रमांक ‘जी उत्तर’ विभागातील कनोसा हायस्कूलमधील इयत्ता पाचवीतील स्वानंदी बुरबूल यांनी पटकाविला.

गट क्रमांक ४ (सातवी ते आठवी)
प्रथम क्रमांक ‘एल’ विभागातील कुर्ला नौपाडा हिंदी शाळेतील इयत्ता ७ वी मधील प्रिती जैसवार, द्वितीय क्रमांक ‘पी उत्तर’ विभागातील एमईकेएस शाळेतील इयत्ता ८ वी मधील आर्य तिवारी आणि तृतीय क्रमांक ‘एच पश्चिम’ विभागातील माणेकजी गजधर मराठी शाळेतील ७ वी मधील सोहम घडशी यांनी पटकाविला.

गट क्रमांक ५ (इयत्ता नववी)
प्रथम क्रमांक ‘ई’ विभागातील पूर्व भायखळा उर्दू शाळेतील सहाना शेख, द्वितीय क्रमांक ‘एफ उत्तर’ विभागातील डॉन बॉस्को हायस्कूलमधील समर्थ चव्हाण आणि तृतीय क्रमांक ‘एच पश्चिम’ विभागातील वांद्रे पेटीट उर्दू शाळेतील ईरम शेख यांनी पटकाविला.

प्रत्येक गटातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस, पदक तसेच प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रत्येकी २० हजार रुपये आणि पदक तसेच प्रशस्तिपत्र, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस १५ हजार रुपये आणि पदक तसेच प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच प्रत्येक गटातील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये आणि पदक तसेच प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर विभाग स्तरावर प्रत्येक गटात ५ याप्रमाणे २५ अशी एकूण २५ प्रशासकीय विभागांमध्ये ६२५ उत्तम चित्रांना प्रत्येकी ५०० रुपयांचे रोख पारितोषिके आणि पदके देखील देण्यात येणार आहेत.

वरीलनुसार आज घोषित करण्यात आलेल्या पारितोषिक विजेत्यांना लवकरच समारंभपूर्वक पारितोषिक प्रदान करण्यात येतील, अशी माहिती कला अकादमीचे प्राचार्य श्री. दिनकर पवार यांनी दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *