राष्ट्रीय चर्मकार संघाचा धारावीत होणार रौप्य महोत्सवी सोहळा
मुंबई, दि १२
राष्ट्रीय चर्मकार संघाचा रौप्य महोत्सवी सोहळा शनिवार दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता धारावीमधील पद्मभूषण मनोहर जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा रौप्य महोत्सवी सोहळा होणार आहे. या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी गुरु रविदास महाराज,संत कक्कया महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,माता सावित्रीबाई फुले,माता रमाई आणि माता फातिमा शेख या संत राष्ट्र पुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव यावेळी होणार आहे.तसेच संत रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीचा शुभारंभही यावेळेस होणार असल्याचे राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगांवकर, महासचिव गणेश खिलारे यांनी सांगितले. आंबेडकरी विचारांचा अंगार फुलविणारे प्रसिध्द शाहीर संभाजी भगत यांच्या मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम यावेळेस होणार आहे.या कार्यक्रमात समाजासाठी उल्लेखनीय सेवा बजावल्या बद्दल श्रीमती कल्पना शिंदे,संतोष भोईर,अॅड नारायण गायकवाड कुंडलिक गवळी,सत्यवान बेलापूरकर,महादेव कृष्णा शिंदे,सिद्राम मारुती नारायणकर यांचा राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे अध्यक्ष बाबुराव माने यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.KK/ML/MS