शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी राज्याचे कर्ज सहापट झाले
मुंबई दि १० : गेल्या वर्षी मंजूर करण्यात आलेल्या एक लाख तेरा हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा हिशेबच लागत नाहीत. अनेक योजनांना निधीच उपलब्ध करून देण्यात आला नाही, या अर्थसंकल्पात देखील तीच स्थिती असेल. राज्यावरील कर्ज डोंगर वाढवूनच विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न दिसत आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करताना राज्याचं कर्ज सहा पट करून ठेवलं आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्यावेळी केली.
आवश्यकता नसताना आणि मागणी नसतानाही रस्त्यांची घोषणा करून अनावश्यक खर्च केला जात आहे. आमच्या महाविकास आघाडीने दोन लाख कर्जमाफीचा निर्णय घेतला होता आता पुन्हा तेवढीच घोषणा करण्यात काय अर्थ आहे अशी टीका पाटील यांनी चर्चेची आज सुरुवात करताना केली.
उद्योगपतींचे कर्ज माफ होते मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना हात आखडता घेतला जातो. कृषी विकासाचा दर दहा ते अकरा टक्के राहिला तरच अर्थव्यवस्था वाढेल मात्र सध्या हा दर केवळ ३.४ टक्के इतकाच आहे असं पाटील म्हणाले.
विकसित राज्य करायचं असेल तर राज्यातील बुद्धिमत्ता राज्याबाहेर जात आहेत त्याचे काय, दुसरीकडे AI मुळे राज्यावर देखील संकट उभे ठाकले आहे, जगभरात असणारी आपली मानवी बुद्धिमत्ता तिकडे बेकार झाली तर ते इथे परत येतील त्यांचे काय करणार आहात असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने राज्यासाठी असणाऱ्या अनेक योजनांमधील राज्याचा निधी कमी केला आहे त्यामुळे त्या पूर्ण होणार कशा हा मोठा प्रश्न आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी यासाठी निधी उपलब्ध करून देण्यापेक्षा रस्त्यांवरच भर दिला जात यामुळे आपली प्राथमिकता चुकते आहे, पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मलई मिळवण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात केला.ML/ML/MS