महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासंदर्भात विशेष चर्चासत्र
मुंबई दि १० – संयुक्तराष्ट्र संघटनेने जाहीर केलेले आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुधवार, दिनांक ११ मार्च, २०२६ रोजी विधान भवन, मुंबई येथे सकाळी १०.०० वाजता महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासंदर्भात विशेष चर्चासत्राचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. यावेळी एम.एस.स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या डॉ.सौम्या स्वामिनाथन आणि डॉ.नित्या राव यांचे महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासंदर्भात व्याख्यान होईल.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात महिला शेतकरी यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. दोन्ही सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांनी या प्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा. राम शिंदे, सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, ॲड. राहुल नार्वेकर, अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, डॉ. नीलम गोऱ्हे, उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद आणि अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष , महाराष्ट्र विधानसभा यांनी केले आहे.
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण, वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, मोनिका राजळे, समिती प्रमुख, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती, आ. डॉ.
ज्योती गायकवाड, मंजुळा गावित, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ जितेंद्र भोळे यांची व्यासपीठावर उपस्थिती असेल.
संयुक्त राष्ट्र संघटनेने यंदाचे वर्ष हे “आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष” म्हणून घोषित केले आहे. जागतिक अन्न व्यवस्थेत महिलांचे अमूल्य योगदान अधोरेखित करणे आणि शेतीमध्ये त्यांना समान संधी, संसाधने, जमीन अधिकार मिळवून देऊन सशक्त करणे, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जाणे अभिप्रेत आहे. या पार्श्वभूमीवर या विशेष कार्यक्रमाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.ML/ML/MS