समग्र शिक्षा संघर्ष समितीचे 3378 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू
मुंबई, दि ९
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे समग्र शिक्षा अंतर्गत गेली 25 वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत कार्यरत असलेल्या सर्व केडरच्या सुमारे ते 3378 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजित करून कायम करण्यात यावे. या मागणीसाठी आझाद मैदानात समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या आंदोलनामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मान. ना. एकनाथ शिंदे यांनी अभ्यास समिती गठित केली होती. या अभ्यास समितीने दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी सेवेत कायम करण्याबाबतचा सकारात्मक अहवाल शासनाला सादर केलेला आहे.
या अहवालातील शिफारस “ब” ला मंजुरी देऊन सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान यशवंत स्टेडियम येथे दिनांक 8 डिसेंबर ते १२ डिसेंबर 2025 पर्यंत 3000 कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण केले असता, आचारसंहिता संपताच सेवेत कायम करण्याचा शब्द मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी देऊन प्रा. मनोहरजी धोंडे व आमदार मा. ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या हस्ते उपोषण संपवले होते. त्यानंतर आचारसंहिता संपून १ महिना होत आला तरीही शासनाने निर्णय घेतलेला नाही. म्हणून सोमवार दिनांक 9 मार्च 2026 पासून पुन्हा आझाद मैदान मुंबई येथे 3000 कंत्राटी कर्मचारी आंदोलनास बसले आहेत. परंतु शासन त्यांची दखल घेत नाही. जोपर्यंत कंत्राटी कर्मचारी पर्मनंट होत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन असेच सुरू राहील आणि यापुढे देखील आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती समग्र शिक्षा संघर्ष समितीचे राज्य उपाध्यक्ष विश्वदीप गोंडाने यांनी दिली.KK/ML/MS