लाडकी बहीण जोडून राज्याच्या इतर योजनांचा लाभ आता महिलांना
मुंबई दि ८ : लाडकी बहीण योजना राज्य सरकारच्या विविध योजनांशी जोडून लाडक्या बहिणींना उद्योजिका बनविण्याचा निर्णय सरकारने घेतला असून यामुळे अर्थव्यवस्थेत भर पडणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त विकसित भारत नारी शक्ती संगम या ग्रामीण महिला नेतृत्व या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
जगात जेवढे विकसित देश आहेत त्यांची वाटचाल बघितली तर या देशांना तेव्हाच विकास करता आला ज्यावेळी त्या देशातील राज्यकर्त्यांना महिला या अर्थव्यवस्थेचे दुसरे चाक आहेत हे समजले. त्यामुळे या सर्व विकसित देशांनी त्या त्या काळात महिला केंद्रित धोरणे आखली, महिलांनी अर्थव्यवस्थेत योगदान दयायाला सुरुवात केल्यानंतर त्या देशांची विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विकसित भारत या संकल्पने अंतर्गत सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक व्यवस्थेची दिशा व सर्व योजना महिला केंद्रित करण्याचे काम केले. त्याचा परिणाम म्हणून २०१४ मध्ये अकराव्या स्थानावर असलेली देशाची अर्थव्यवस्था आज ४ थया क्रमांकावर पोहोचली आहे व लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. या सगळ्यांच्या पाठीशी महिला केंद्रित धोरणे आपल्याला पाहायला मिळतात. बेटी बाचाओ बेटी पढाओ पासून झालेली सुरुवात आज लखपती दीदी पर्यंत येऊन पोहोचली आहे असं देखील फडणवीस म्हणाले.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, सदस्या रेखा महाजन, पद्मश्री पोपटराव पवार, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता आदी
उपस्थित होते. या परिषदेत देशभरातील व्यवसाय,
उद्योग, राजकारण आणि सामाजिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सुमारे ५०० ग्रामीण महिला सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या यशस्वी वाटचालीचे अनुभव त्यांनी परिषदेत कथन केले.ML/ML/MS