७८ वर्षीय आजींची कमाल, सुवर्णपदकासह पूर्ण केले MA मराठी
इंदूर, दि. १७ : मनापासून शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर वयाचा अडथळा येत नाही. हे इंदुर येथील ७८ वर्षीय आजींनी सिद्ध केले आहे. येथील सुषमा मोघे यांनी उतारवयात शैक्षणिक प्रवास सुरू केला आणि देवी अहिल्या विद्यापीठाच्या मराठी भाषेतील एम.ए. अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. निवृत्तीनंतर आयुष्य कारणी लावताना त्यांनी हे यश मिळवले आगे. मंगळवारी मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवल्याबद्दल मोघे यांना सुवर्णपदक प्रदान केले.
सुषमा मोघे म्हणाल्या, “मला माहित नव्हते की मी या वयात मराठीमध्ये एम.ए. करू शकेन. जेव्हा मला याबद्दल कळले तेव्हा मी संधीचा पुरेपूर फायदा घेतला,”. देवी अहिल्या विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. राकेश सिंघाई यांनी ७८ वर्षीय महिलेच्या अभ्यासाच्या आवडीचे कौतुक केले. ते म्हणाले, “एमए. अभ्यासक्रमाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मोघे यांना सुवर्णपदक मिळणे ही आमच्या विद्यापीठासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”