जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीचाच झेंडा
मुंबई, दि. ९ : मनपा निवडणूकांप्रमाणेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांमध्ये मतदारांनी महायुतीलाच कल दिला आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. त्यात भाजपने सर्वाधिक 7 जिल्हा परिषदांवर आपले वर्चस्व निर्माण केले आहेत. तर सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 2 जिल्हा परिषदा मिळाल्या आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी, शनिवारी, मतदान पार पडलं. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी 7 हजार 438 उमेदवार रिंगणात होते.
पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे. या निवडणुकांच्या निकालांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि अंतिम टप्प्यातले कल पाहता महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला असल्याचे दिसत आहे. 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थापित झाला आहे. या सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, साधारण आपण बघितले तर जवळपास 60 ठिकाणी भाजप नंबर एकवर आहे. छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा. शिवसेना दोन ठिकाणी नंबर एकवर आहे, रत्नागिरी आणि रायगड. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्यात नंबर एकवर आहे. जिथे तीनही पक्ष एकत्रित लढलो अशा कोल्हापूर आणि लातूरमध्ये देखील आम्हीच नंबर एकवर आहोत. त्यामुळे मला असे वाटते की अतिशय चांगला हा कल समोर आलेला आहे. भाजपसाठी देखील आपला 2017 चा रेकॉर्ड तोडला आहे. 2017 साली भाजपला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 141 जागा होत्या. आता अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत, पण घोषित झालेल्या निकालात 236 जागा भाजपला मिळाल्या आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक जागा जिंकल्या असून आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या 172 जागा जिंकल्या असून पुणे जिल्ह्यात जवळपास 44 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या फोटोसह जल्लोष केला. तर, काहींचा दादांच्या आठवणीने कंठ दाटल्याचंही पाहायला मिळालं. पुणे जिल्हा परिषदेच्या 74 जागांसाठी ही निवडणूक होत असून येथे राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 40 पेक्षा जागा जिंकत पक्षाचं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
SL/ML/SL