धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
धुळे दि २८ – धुळे जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून ,थाळनेरसह शिरपूर परिसरात गारपीट झाली. अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या गारपिटीचा फटका थाळनेर, अजनाड, सावेर, बभळाज, तरडी, होळनांथे, भाटपुरा, अहिल्यापूर, वाठोडा, नागेश्वर बंगला इत्यादी गावांच्या शिवारांना बसला आहे.
या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी यासह केळी व पपई पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली असून रस्त्यांवरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. गारपिटीनंतर अनेक भागात बर्फाची चादर पसरल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, धुळे तालुक्यातील निमगुळ, नरडाणा व सोनगीर मंडळातही अवकाळी पावसाने हजेरी लावली . गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांमध्ये तलाठी व कृषी सहाय्यक यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ML/ML/MS