कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठानतर्फे भूषण – गौरव पुरस्काराने सन्मान
ठाणे दि १ : पुढारी वृत्तसेवा
कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठानतर्फे जेष्ठ समाजसेवक गजानन सकपाळ यांचा समाज भूषण आणि कोकणातील नऊ कर्तबवान रत्नांचा समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोकण पुत्र बिग बॉसचा दुसऱ्या उपविजेता फेम प्रणित मोरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
ठाण्यातील आर्य क्रीडा मंडळाच्या सभागृहात कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठानचा भव्य दिव्य सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रमुख पाहुणे निवृत्त मेजर सुभेदार अनंत मोरे आणि आयडीबीआय सहाय्यक महाव्यवस्थापक सुदेश मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुरस्कार विजेते आणि विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते जेष्ठ समाजसेवक गजानन सकपाळ यांचा समाज भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तर उल्हासनगर पालिकेतील वरिष्ठ अधिकारी अंकुश कदम, निवृत्त पोलीस निरीक्षक अविनाश जाधव, आदर्श शिक्षक सुधाकर पाष्टे, उद्योजक चंद्रकांत कदम, शाहीर मंगेश यादव, आधुनिक शेती करणारे संजय शिंदे, उद्योजक संतोष जाधव आणि आधुनिक शेती प्रदीप कदम, पॉवर लिफ्टर राकेश मोरे यांना प्रमुख पाहुणे तसेच अध्यक्ष सुनील मोरे, कार्याध्यक्ष दीपक मोरे, उपाध्यक्ष दिलीप शिंदे, उपाध्यक्ष रामचंद्र मोरे आणि खजिनदार तेजस जाधव यांच्या हस्ते समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बिग बॉस फेम प्रणित मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी दहावी, बारावी आणि उच्च शिक्षित गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी पूर्वा सकपाळ, योगेश जाधव यांचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दीपक मोरे यांनी प्रस्तावना, पूर्वा सकपाळ यांनी सूत्रसंचालन तर अजित सकपाळ यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमिटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी मेहनत घेतली.ML/ML/MS