वसई कला क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन…
वसई दि २८ : कला आणि क्रीडा हे मानवी जीवनाचे एक अंग आहे. हे दोन अंग मजबूत झाले तर मानवी जीवन समृद्ध होईल. कला क्रीडा महोत्सवात आपण जात,पात ,धर्म विसरून एकत्र येत असतो. देवाने कला आणि क्रीडा ही मानवाला दिलेली देणगी आहे. हा महोत्सव हे वसईच्या एकोप्याचे प्रतीक आहे. ही सांस्कृतिक चळवळ गेली ३६ वर्षे सुरु आहे. ती अशीच सुरु राहावी असे सांगून वसई धर्म प्रांताचे आर्च बिशप थॉमस डिसोझा यांनी कला क्रीडा महोत्सवाच्या खेळाडूंना शुभेच्छा देतानाच नाताळच्याही शुभेच्छा दिल्या. त्यांनी यावेळी कला क्रीडा मोहोत्सवाचे पहिले कार्याध्यक्ष मुकेश सावे यांचे समरण केले.
आता या मोहोत्सवात ६० हजार खेळाडू आहेत मोहोत्सवाच्या ५० व्या वर्षी ते १ लाख होवोत अशी अपेक्षा बिशप यांनी व्यक्त केली. ते ३६ व्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध सिने दिगदर्शक आणि अभिनेता अमोल गुप्ते,रोहित श्रमाचे प्रशिक्षक दिनेश लाड,आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाच्या ज्योतीचे प्रज्वलन काल दुपारी २. ३० वाजता विरार येथील स्वा. सावरकरांच्या पुतळ्याजवळ माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले . संपूर्ण वसई मध्ये फिरून ही क्रीडा ज्योत संद्याकाळी वसईतील नरवीर चिमाजी आप्पा मैदानात आली. त्यानंतर या क्रीडा ज्योतीने मैदानावरील क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रास्ताविक करताना सचिव केवल वर्तक यांनी महोत्सवाच्या आता पर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. या कार्यक्रमात महोत्सवाचे पहिले कार्याध्यक्ष मुकेश सावे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. सिने दिगदर्शक अमोल गुप्ते यांनी सांगितले कि, कला क्रीडा मोहोत्सवात आतापर्यंत मी दहा वेळा आलो आहे, हे माझे घर झाले आहे. येथील स्पर्धकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. तर दिनेश लाड हे हा महोत्सव पाहून भारहून गेले होते. त्यांनी सांगितले कि, वसई मध्ये खूप प्रतिभा आहे. मुख्य म्हणजे याठिकाणी क्रिकेट सोडून सर्व देशी खेळ आहेत. क्रिकेट मध्ये पैसे आहे म्हणूं पालक आपल्या पाल्याला क्रिकेट मध्ये घालतात. परंतु त्या मुलाकडे प्रतिभा नसेल तर त्याला पुढे जात येत नाही. त्यामुळे आता पालकांनी देशी खेळामध्येही आपल्या पाल्याला प्रोत्साहन द्यावे . त्यातही आता बऱ्यापैकी पैसे मिळू लागला आहे. हा महोत्सव पाहून २०३६ च्या ऑलिम्पिक मध्ये येथील खेळाडू खेळताना दिसतील अशी आशा त्यांनी शेवटी व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार क्षितीज ठाकूर , राजेश पाटील,माजी खासदार बळीराम जाधव,माजी महापौर नारायण मानकर ,प्रवीण शेट्टी.वसई विकास बँकेचे चेअरमन आशय राऊत,वसई जनता बँकेचे चेअरमन महेश देसाई,जगदीश राऊत,पंचायत समितीचे माजी सभापती अशोक पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशोक कुलास व मुकेश सावे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुकेश सावे यांच्या आठवणींना उजाळा देतानाच माजी नगराध्यक्ष राजू रोडे आणि अब्दुल हक पटेल यांच्याही आठवणी जागविल्या. त्यांनी यावेळी सांगितले कि अगोदर मॅरॅथॉन,मग विभागीय कला क्रीडा महोत्सव रद्द करून खेळात राजकारण आणण्याचे काम याठिकाणी करण्यात आले. परंतु महोत्सवाच्या कार्यकर्त्यांनी मागे न हटता हा महोत्सव केला आहे. वसई मध्ये चांगल्या कामाच्या मागे लोक उभी राहतात . त्यामुळे कोणी कितीही देव महोत्सव होऊ नये. यासाठी पाण्यात ठेवले तरी महोत्सव हा होणारच असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अश्विनी भोईर यांनी केले.ML/ML/MS