बांगलादेशातील हिंदू युवकाची अमानुष हत्या निषेधार्ह; जागतिक समुदायाने हस्तक्षेप करावा – विश्व हिंदू परिषद
मुंबई, दि २२-
बांगलादेशातील मैमनसिंह येथे हिंदू युवक दीपु चंद्रदास याची जमावाकडून करण्यात आलेली अमानुष हत्या अत्यंत निंदनीय व अस्वीकार्य असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ अधिवक्ता आलोक कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत केले. कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली युवकाला जिवंत जाळण्यात आल्याची माहिती देत त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
आलोक कुमार म्हणाले की, “सर्व देव वेगवेगळ्या नावांनी एकच आहेत” या विधानालाच ईशनिंदा ठरवून ही जघन्य घटना घडली. निर्वासित लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या तस्लिमा नसरीन यांनीही या प्रकरणात खोटा आरोप लावण्यात आल्याचे सांगितले असून, पोलिस संरक्षण अपयशी ठरल्याचे निदर्शनास आणले आहे. हे बांगलादेशमधील कायद्याच्या राज्याच्या ऱ्हासाचे गंभीर द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.
बांगलादेशात सध्या अराजकता वाढत असून हिंदू, शीख व इतर अल्पसंख्याकांवर संघटित हिंसा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या परिस्थितीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. भारतानेही मूकदर्शक न राहता सर्व कूटनीतिक व मानवी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मुहम्मद युनूस यांना दिलेला नोबेल शांतता पुरस्कार तात्काळ परत घ्यावा, अशी मागणी करत विश्व हिंदू परिषदेने देशभर आंदोलन छेडण्याची घोषणा केली.KK/ML/MS