सीताफळांच्या झाडांवर शेतकऱ्याने फिरवला जेसीबी
जालना दि २ : जालन्यातील एका शेतकऱ्याने 400 सीताफळांच्या झाडांवर जेसीबी फिरवला आहे. सीताफळ बागेतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने आपली 7 वर्षे जोपासलेली बाग नष्ट केली आहे. ही घटना जाफराबाद तालुक्यातील नळविहिरा येथे घडली आहे.
नळविहिरा येथील शंकर भिकाजी गाडेकर या शेतकऱ्याने 7 वर्षांपूर्वी आपल्या शेतात मोठ्या मेहनतीने 400 सीताफळांच्या झाडांची लागवड केली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सततची नैसर्गिक आपत्ती, कीटकांचा प्रादुर्भाव आणि बाजारातील घसरती किंमत यामुळे त्यांना या पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शंकर गाडेकर यांनी टोकाचा निर्णय घेत आपल्या 400 सीताफळांच्या झाडांची बाग जेसीबी फिरवून नष्ट केली आहे.ML/ML/MS