राष्ट्रगीताची पंच्याहत्तरी

 राष्ट्रगीताची पंच्याहत्तरी

उमेश काशीकर

‘जन गण मन अधिनायक जय हे’ या रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या भारताच्या राष्ट्रगीताला दिनांक २४ जानेवारी १९५० रोजी देशाच्या राज्यघटना सभेने (Constituent Assembly) राष्ट्रगीत म्हणून अधिकृत मान्यता दिली. त्यामुळे आज, दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रगीताच्या अधिकृत स्वीकृतीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत !!

दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालेल्या भारताच्या राष्ट्रगीताबाबत पहिल्या दिवशी कोणताही निर्णय झाला नसल्याने स्वातंत्र्याच्या दिवशी नेमके कोणते राष्ट्रगीत असावे हा संभ्रम बहुतांश ठिकाणी निर्माण झाला असणे स्वाभाविक आहे.

या संदर्भातील मुंबई राज्यात झालेला पत्रव्यवहार महत्वाचा आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा करीत असताना राष्ट्रगीत कोणते गायले जावे, असा प्रश्न मुंबई राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्यामुळे दिनांक ११ ऑगस्ट १९४७ रोजी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या जेमतेम ४ दिवस अगोदर एक महत्वाचे ‘तातडीचे पत्र’ मुंबई राज्याच्या तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना धाडले गेले.

मुख्य सचिव यांच्या वतीने जे. चावेज यांच्या सहीने ‘बॉम्बे कॅसल’ येथून जारी केलेल्या या पत्रात म्हटले आहे की,

“सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की स्वातंत्र्य दिन साजरा करताना दिनांक १५ ऑगस्ट रोजी ‘गॉड सेव्ह द किंग’ हे गीत गाऊ किंवा वाजवू नये. त्याऐवजी हवे असल्यास ‘वंदे मातरम’ गाण्यास किंवा वाजवण्यास हरकत नाही. नव्या राष्ट्रगीताबाबत यथावकाश आदेश निर्गमित केले जातील.”

दिनांक १५ ऑगस्ट १९४७ ते २४ जानेवारी १९५० या कालावधीत कोणतेही एक अधिकृत राष्ट्रगीत नसल्यामुळे ‘जन गण मन ‘ आणि ‘वंदे मातरम’ यापैकी कोणतेही राष्ट्रगीत गायले जायचे.

७५ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी, म्हणजे दिनांक २४ जानेवारी १९५० रोजी ‘जन गण मन’ वर राष्ट्रगीत म्हणून मोहर उठवली गेली. त्यानंतर दोनच दिवसांनी भारताचा प्रजासत्ताक म्हणून प्रवास सुरु झाला !

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *