मुंबईकरांच्या सेवेत नवीन ४४ दवाखाने कार्यान्वित

 मुंबईकरांच्या सेवेत नवीन ४४ दवाखाने कार्यान्वित

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईकरांच्या आरोग्य सेवेमध्ये नवीन मापदंड स्थापन केलेल्या हिंदुह्दयस्रमाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची संख्या वाढून आता १५१ झाली आहे. 44 new clinics to serve Mumbaikars
उद्या (७ एप्रिल) जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जाणार असून आरोग्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवीन ४४ आपला दवाखाने सुरु करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, फिजिओथेरपी व नेत्र चिकित्सा सुविधा, मानसिक विकारांची पडताळणी करणारी मनशक्ती क्लिनिक सेवा आणि १८ वर्ष वयावरील नागरिकांची दंत तपासणी असे वेगवेगळे उपक्रम देखील सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने सुरु करण्यात येत आहेत. यामुळे मुंबईकरांच्या सर्वांगीण आरोग्य सेवेचा दृढ संकल्प प्रत्यक्षात उतरला आहे.

जगभरात ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या स्थापने निमित्त तसेच जागतिक पातळीवर आरोग्याच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करणे, या दृष्टिने या दिवसाचे महत्व आहे. जागतिक आरोग्य संघटनेची यंदाच्या अमृत महोत्सवी वर्षाची संकल्पना ‘सर्वांसाठी सुदृढ आरोग्य’ अशी आहे. ही बाब लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने वेगवेगळ्या आरोग्य सेवांचा विस्तार करण्यात येत आहे.

नवीन ४४ हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची भर-

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेमध्ये १०७ दवाखाने कार्यान्वित आहेत. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आता नवीन ४४ दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आपला दवाखान्यांची एकूण संख्या आता १५१ इतकी झाली आहे. यामध्ये संपूर्ण मुंबई महानगरात मिळून २४ पॉलिक्लिनिक आणि डायग्नॉस्टिक केंद्र आहेत. तर १२७ दवाखाने आहेत, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे यांनी दिली.

फिजिओथेरपी व नेत्र चिकित्सा सुविधा-
येत्या दोन महिन्यांमध्ये आपला दवाखानाच्या माध्यमातून फिजिओथेरपी आणि नेत्ररोग सेवा देखील उपलब्ध होणार आहे.

मनशक्ती क्लिनिक-
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आता प्राथमिक आरोग्य स्तरावर मनशक्ती क्लिनिक ही सुविधा मुंबईकरांना दिनांक ७ एप्रिल २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत ५०० वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानसिक आरोग्य सेवा सुविधा पुरवण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महानगरपालिकेचे सर्व दवाखाने त्याचप्रमाणे आपला दवाखान्यांमध्ये येणाऱया रुग्णांच्या मानसिक विकारांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर पुढील उपचारांची आवश्यकता असणाऱया रुग्णांना महानगरपालिकेच्या नजीकच्या रुग्णालयांत किंवा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पाठवून उपचार पुरवले जातील. पॉलिक्लिनिकमध्येही लवकरच मानसोपचार सेवा उपलब्ध होणार आहेत.

मौखिक आरोग्य तपासणी-
जागतिक पातळीवर मौखिक कर्करोग ही मोठी समस्या आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘स्टेप सर्वेक्षण २०२१’ नुसार १३ टक्के मुंबईकर तंबाखूचे सेवन करतात. यामध्ये पुरूषांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे मौखिक आरोग्याशी संबंधित तपासणी व निदान वेळीच केल्यास रूग्ण मृत्यू दर कमी करणे शक्य आहे. हा मुद्दा नजरेसमोर ठेवून, महानगरपालिकेचे मुंबईतील ३० क्लिनिक आणि १५ पॉलिक्लिनिकमध्ये १८ वर्षांवरील सर्वांची दंतवैद्यांद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, घसा खवखवणे, तोंडात किंवा जिभेवर पांढरे डाग आणि तोंड उघडण्यात अडचण असलेल्यांची दंतचिकित्सकामार्फत वैद्यकीय अधिकारी तपासणी करतील. यामध्ये संशयित रुग्णांना पुढील निदान, तपासणी व उपचारांसाठी महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये पाठवले जाईल. १ एप्रिल २०२३ पासून याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

ML/KA/PGB
6 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *