राज्यातून ३८७ अमृत कलश दिल्लीतील अमृत वाटीकेत

 राज्यातून ३८७ अमृत कलश दिल्लीतील अमृत वाटीकेत

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘माझी माती माझा देश’ अभियान अंतर्गत ‘अमृत कलश’ यात्रा कर्तव्य भावनेतून यशस्वी करा. या यात्रेतून राज्यातील प्रत्येक कुटुंबात,घरा-घरात राष्ट्रभक्तीचे भावना जागृत होईल असे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपासाठी आयोजित नवी दिल्लीतील कार्यक्रमासाठी यात ग्रामीण भागातून ३५१ आणि नागरी क्षेत्रातून प्रत्येक जिल्ह्याचे ३६ असे राज्यातून एकूण ३८७ कलश पाठवण्यात येणार आहेत.

या कलशासाठी माती किंवा तांदुळ संकलनाची मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अमृत कलश यात्रेबाबत बैठकीत माहिती देण्यात आली. बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी या अमृत कलश यात्रेच्या नियोजनाबाबत सादरीकरण केले. तसेच यात्रेतील विविध टप्प्यांची माहिती दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपण माझी माती –माझा देशमधील पहिला टप्पा यशस्वी केला आहे. यात वीरांची नावे असलेले शिलाफलक लावले, वसुधा वंदन अंतर्गत वृक्षारोपण केलं, पंचप्रण शपथही घेतली आहे. अमृत कलश यात्रा चार टप्प्यात पार पडणार आहे. चारही टप्पे आपल्यासाठी महत्वाचे आहेत हे लक्षात घ्यावे आणि त्यादृष्टीने सर्व प्रशासनातील सर्व यंत्रणांनी नियोजन करावे. हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही. तर अतिशय गांभीर्याने तसेच देशभक्तीची भावना घेऊन अमृत कलश यात्रेत आपला सहभाग द्यायचा आहे.

आपला विभाग, जिल्हा, तालुका आणि अगदी ग्रामपंचायत पातळीपर्यंत या यात्रेत मनापासून आणि उत्स्फुर्तपणे आपल्याला काम करायचे आहे. ग्रामीण असो किंवा शहरी असो, आपल्या भागातील प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना अमृत कलश यात्रेबाबत व्यवस्थित जबाबदारी द्या. प्रत्येक घर, प्रत्येक नागरिक, विद्यार्थी या सगळ्यांचा सहभाग कसा मिळेल यासाठी नियोजन करा.मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभाग तसेच माझ्या सचिवालयातून सुद्धा यावर सनियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

आता उत्सव आणि सणवारांचे दिवस येणार आहेत. त्यांचा उपयोग करून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात यावे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची ही संकल्पना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने राबवण्यात येत आहे. प्रधानमंत्र्यांनी जागतिकस्तरावरीही आपल्या देशाचा नाव लौकीक वाढेल असे काम केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना, स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्याची ही संधी आहे. त्यामुळे हा अमृत कलश यात्रेच्या नियोजनातही महाराष्ट्राचे नाव अग्रक्रमाने घेतले पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

अमृत कलश यात्रेविषयी…

अमृत कलश यात्रेचा शुभारंभ केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
पहिला टप्पा: १ ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती किंवा तांदूळ कलशांमध्ये गोळा करायचा आहे. हे करतांना आनंदी आणि उत्साहाचे वातावरण हवे. वाजतगाजत ही माती गोळा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातून माती आणि शहरी भागातून तांदुळ या कलशात एकत्र करण्यात येईल.
१ ते १३ ऑक्टोबरपर्यंत तालुका स्तरावर आणि पालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या स्तरावर ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून एका मोठ्या कलशामध्ये एकत्र करण्यात येईल. यावेळी सुद्धा आपल्या जिल्हा किंवा शहरातल्या सांस्कृतिक संस्था, एनसीसी, एनएसएस, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून कार्यक्रम केले जातील. यात या संबंधित परिसरातील देशासाठी लढलेले आणि उल्लेखनीय कामगिरी केलेले जवान, पोलीस, स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्म्यांचे कुटुंबीय यांना बोलवून त्यांचा गौरव करण्यात येईल.

२२ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील. २७ ऑक्टोंबरला मुंबईतून विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीकडे रवाना करण्यात येतील. त्यावेळीही मोठा सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.
28 ते 30 ऑक्टोंबरपर्यंत देशाच्या राजधानीत रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येतील. १ नोव्हेंबर रोजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या “अमृत वाटिके”त या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येईल.

ML/KA/SL

4 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *