26 जानेवारीला अजेय संस्थेचा तंत्रोत्सव
ठाणे , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्यक्रमाची विविधता देणाऱ्या अजेय संस्थेचा 26 जानेवारी 2024 रोजी तंत्राला अनोखी मानवंदना देण्यासाठी तंत्रोत्सव हा कार्यक्रम विष्णुनगर, ठाणेमध्ये असलेल्या विद्यालंकार सभागृह, डॉ बेडेकर विद्यामंदिर इथे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे.
पूर्ण दिवस चालणारा आणि एकाच विषयाच्या अनेक बाजू मांडणारा कार्यक्रम दरवर्षी अजेय संस्था देत असते.
गेल्या काही वर्षात शतकोटी,या हसू या ( विनोदावर ऑनलाईन संमेलन ),सृजनोत्सव, नमस्कार,तेजयान असे विविध विषय आजवर हाताळल्या नंतर यावर्षी तंत्रज्ञान हा विषय घेऊन संस्था तंत्रोत्सव साजरा करत आहे.
कार्यक्रमाची माहिती सांगताना डॉ क्षितिज कुलकर्णी म्हणतात,
“कला, साहित्य हे खरे तर आपले विषय,पण त्यातही तंत्र आहेच.सूर ताल, लय, मात्रा हे सगळं एक तंत्रच तर आहे कथेची गाठ , निरगाठ ,उकल हे तंत्र नाही तर काय आहेत? अभिनयात नवरस ,भाव व्यक्त करण्यास शरीराचा वापर हे तंत्रच तर आहे. समीक्षा हे तंत्र आहे .वृत्त ,अलंकार ही काव्य तंत्र आहेत. अगदी ललित लेखनाचे सुद्धा तंत्र आहेच की! एखादी गोष्ट आपण वापरतो ,
अगदी तिच्यानुसार जगणं सोपं करून जगत राहतो पण हे करता करता थोडं थांबून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे मात्र विसरून जातो.
आज तंत्राची थोडी तशीच अवस्था होते आहे त्यासाठीच या तंत्र उत्सवाचे प्रयोजन”
संपूर्ण दिवस चालणारा हा कार्यक्रम दिवसभरात सहा सत्रांमध्ये सादर होणार आहे .
या तंत्र उत्सवाचे उद्घाटन सकाळी 9 वाजता ज्येष्ठ कवी आणि तज्ञ मार्गदर्शक राजीव जोशी करणार आहेत. तसेच या सत्रामध्ये विशेष वृत्तबद्ध काव्य संमेलनही आयोजित केलेले आहे. अध्यक्षीय प्रास्ताविक गौरव संभूस करतील.या सत्राचे निवेदन विदुला खेडकर करतील. सकाळी 10.30 ते 12 या वेळेत एका विशेष परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादात पत्रकार माननीय संतोष देशपांडे गिर्यारोहण आणि साहस खेळ तज्ञ प्रदीप केळकर तसेच तंत्र कुशल उद्योजक कार्तिक बोलार यांच्याशी हृषिकेश ताम्हणकर संवाद साधतील .
दुपारी बारा ते एक या तिसऱ्या सत्रामध्ये डॉ भूषण केळकर यांचा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण’ या विषयावर अस्मिता चौधरी तज्ञसंवाद साधणार आहेत. दुपारी 1.45 ते 2.45 च्या सत्रामध्ये शतशः स्नेहसंमेलन साजरे होणार आहे .या संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ कवियत्री आणि लेखिका सुजाता राऊत असतील. त्यांच्याशी ललित लेखन तंत्रावर संवाद साधला जाईल. तसेच शतकोटी रसिक विशेष सन्माननीय सहभागी डॉक्टर स्मिता दातार ,आनंद लेले आणि आपले काही शतकोटी रसिक यांचा गुणगौरव होणार आहे.
या सत्राचे निवेदन अश्विनी चौधरी आणि उमा रावते करणार आहेत.
दुपारी 2.45 ते 3.30 या वेळेत असलेल्या अभिनय आणि तंत्र या सत्रात कार्तिक हजारे आणि समीर शिर्के ‘मूक नाट्य एक अभिनय तंत्र’ सादर करतील.
दुपारी 3.30 ते संध्याकाळी 5 पर्यंत विशेष मान्यवर तंत्र संवाद आयोजित केला आहे. यात सुप्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्याशी संवादक वेद निकम हे संवाद साधतील .
संध्याकाळी पाच ते सात या वेळेत असलेल्या साहित्य आणि तंत्र या विशेष मान्यवर तंत्र संवादात सुप्रसिद्ध लेखक समीक्षक आणि दिग्दर्शक गणेश मतकरी यांच्याशी डॉक्टर क्षितिज कुलकर्णी संवाद साधणार आहेत. अशा विविध रंगांनी रंगलेल्या भरगच्च कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ML/KA/PGB 21 Jan 2024