कुत्रा चावल्याने म्हशीच्या मृत्यू, 180 जणांनी घेतले रेबीजचे इंजेक्शन

नांदेड, दि. ८ : जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिसाळलेला कुत्रा चावल्याने म्हैस दगावल्याची घटना घडली. मात्र, म्हशीचा मृत्यू होण्यापूर्वी तिचं दूध गावात अनेक ठिकाणी वितरित झाले होते. तसेच चहा अन्य पदार्थांत दुधाचा वापर झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळं गावातील 180 जणांना रेबीजची लस देण्यात आली आहे.
मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात किशन दशरथ इंगळे यांच्या म्हशीला कुत्र्याने बऱ्याच दिवसापूर्वी चावा घेतला होता. त्यानंतर काही दिवसांनी म्हैस अचानक आजारी पडली. कुत्रा चावल्याची लक्षणे उशीरा समजल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने 5 ऑगस्ट रोजी म्हैस दगावली. मृत्यूपूर्वी तिचं दूध गावात अनेक ठिकाणी वितरित झाले होते. तसेच चहा अन्य पदार्थांत वापर झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकूण 180 लोकांनी दुध प्राशन केल्याचे निष्पन्न झाले. 180 लोकांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली होती. गावात आरोग्य विभागाचे पथक तळ ठोकून आहे. म्हशीला रेबीज झाला असेल म्हणून आम्हाला होईल ही भीती लोकांना होती. त्यामुळं त्यांनी लस घेतल्याचे डॉ प्रणिता गव्हाणे यांनी सांगितले.
SL/ML/SL