१८ वर्षीय प्रज्ञानंदन विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत
बाकू (अझरबैजान), दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आपली स्वप्नवत घोडदौड कायम राखताना अमेरिकेच्या फॅबियानो कारूआनाला पराभवाचा धक्का देत काल विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदासाठी त्याला अव्वल जागतिक बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला नमवण्याची किमया साधावी लागेल.
पारंपरिक पद्धतीचे दोन डाव बरोबरीत सुटल्यानंतर ‘टायब्रेकर’मध्ये गेलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत १८ वर्षीय प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या कारूआनाला ३.५-२.५ अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा प्रज्ञानंद हा विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
आनंदने सन २००० आणि २००२मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. मात्र, त्यावेळी ही स्पर्धा साखळी आणि बाद पद्धतीने खेळवली जात होती. तर २००५पासून विश्वचषक स्पर्धा केवळ बाद फेरी पद्धतीने खेळवली जात आहे. त्यामुळे प्रज्ञानंदच्या यशाला विशेष महत्त्व आहे.
SL/KA/SL
22 Aug 2023