मुंबईजवळ उभारले जाणार 1 लाख आसन क्षमतेचं स्टेडिअम
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर मुंबईतल्या खेळाडूंचा विधिमंडळामध्ये सत्कार केला गेला, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला मोठ्या आणि अद्ययावत स्टेडियमची गरज असल्याचं वक्तव्य केलं होतं, त्यानंतर आता या स्टेडियम उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबईजवळ लवकरच 1 लाख आसन क्षमतेचं स्टेडियम उभारलं जाणार आहे. मुंबईमध्ये वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईत डी.वाय.पाटील ही आंतरराष्ट्रीय स्डेटियम असताना आता मुंबईला आणखी एक अद्ययावत आणि 1 लाख क्षमता असलेलं स्टेडियम मिळणार आहे. महाराष्ट्रातलं हे सगळ्यात मोठं आणि देशातलं दुसरं सगळ्यात मोठं स्टेडियम असेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए हे स्टेडियम उभारणार आहे
मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपासून 68 किमी अंतरावर आणि ठाण्यापासून 26 किमी अंतरावर हे स्टेडियम उभारलं जाणार आहे. कल्याणच्या जवळ अमाने गावामध्ये हे स्टेडियम उभारलं जाईल. 50 एकर जमिनीवर हे स्टेडियम उभारलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
ही जमीन विकत घेण्यासाठी एमसीएने एमएसआरडीसीने काढलेली खुली निविदा भरली आहे. महाराष्ट्र सरकारकडून स्टेडियम उभारणीला परवानगी मिळावी, याची एमसीए वाट पाहत आहे. भारतात सध्या अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे सगळ्यात मोठं आहे. या स्टेडियममध्ये एकावेळी एक लाख 30 हजार प्रेक्षक बसू शकतात. तर मुंबईत वानखेडे स्टेडियमची क्षमता 33 हजार आणि ब्रेबॉर्न स्टेडियमची क्षमता 20 हजार एवढी आहे. तर नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये एकावेळी 45 हजार प्रेक्षक बसू शकतात.
SL/ML/SL
8 July 2024