सैनिकांसाठी सिंधुताईंच्या लेकींनी पाठविल्या एक हजार राख्या
पुणे दि ३०– भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिक मात्र प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र पहारा देतात. सख्खा भाऊ नसला तरी सीमेवरील या सैनिकांना भाऊ मानणाऱ्या सिंधुताईंच्या लेकींनी सीमेवर एक हजार राख्या पाठविल्या आहेत.
अनाथांची माई पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन कुंभारवळण या संस्थेत ”एक राखी सीमेवरील भावासाठी – सैनिक हो तुमच्यासाठी” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. ‘भारतीय सण हे नाती दृढ करणारे सण आहेत. गेल्या काही वर्षांपासून या सणांना सामाजिकतेची जोड मिळत आहे. समाजाच्या या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करून देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, यासाठी मागील वर्षीपासून सिंधुताई सपकाळ यांचे पाहिले मानसपुत्र दिपक दादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून ”एक राखी सीमेवरील भावासाठी – सैनिक हो तुमच्यासाठी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावर्षी हे दुसरे वर्ष असून नुकतेच सीमेवरील वेगवेगळ्या भागात असलेल्या सैनिकांच्या बेस कॅम्पवर स्पीड पोस्टाद्वारे एक हजार राख्या पाठविण्यात आल्या आहेत. मागीलवर्षी या सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून राखी बांधतानाचे फोटो देखील पाठविले आहेत. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रति प्रत्येकाला आदर अन् अभिमान वाटत असतो. हा आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी राखी आणि शुभेच्छापत्रे हा एक उत्तम मार्ग आहे. राखी आणि शुभेच्छा पत्रांमुळे सैनिकांचेही मनोबळ वाढवण्यास मदत होते.
देशाचे संरक्षण करणार्या सैनिकांना अधिक आत्मबल मिळावे यासाठी मुलांना शालेय वयातच शिस्त लावण्याचे आणि देशाभिमान जागृत करण्याचे काम माई सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत लेकींकडून होत असल्याबद्दल ममता बाल सदन संस्थेचे दिपक दादा गायकवाड यांनी कौतुक केले. मलाही भविष्यात सैनिक होऊन भारत मातेची सेवा करायची आहे. आपल्या भारत मातेच्या रक्षणार्थ उभ्या असलेल्या आमच्या बांधवांचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय.
केवळ एकाचं नाही तर देशातील प्रत्येक बहिणींचे भाऊ अहोरात्र भारतमातेचे रक्षण करण्यासाठी सीमेवर उभे आहेत, याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशा भावना ममता बाल सदन मधील मुलींनी व्यक्त केल्या आहेत. एवढच नव्हे तर देशातील आमच्या तमाम सैनिक बांधवांना सुरक्षित आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावे, अशी ईश्वरचरणी सामुहिक प्रार्थना केली. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता ममता बाल सदनच्या अधीक्षिका स्मिता पानसरे, सुजाता गायकवाड, संजय गायकवाड, सरोज जांगडा, मोनिका क्षीरसागर, कल्पना कुंजीर, चांदणी शिरोळकर यांनी परिश्रम घेतले.