विषबाधा प्रकरणाने गडचिरोलीत खळबळ, १२३ विद्यार्थी बाधित

गडचिरोली, दि. २१ () : धानोरा तालुक्यातील सोडे गावात शासकीय आश्रमशाळेत सकाळी नाष्ता केल्यानंतर आज पुन्हा १७ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी १०६ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकूण विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२३ वर पोहोचली आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सोडे गावात माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालय आहे. २० डिसेंबरला दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना कोबी, वरण भात तसेच गाजर खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी, मळमळ असा त्रास जाणवू लागला. त्यावेळी तब्बल १०६ विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते.
अन्नातून विषबाधा झाल्यामुळे ४८ तास या सर्वांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, आज सकाळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नाष्त्यात वटाण्याची उसळ दिली होती. ती खाल्ल्यानंतर १७ विद्यार्थ्यांना मळमळ, डाकेदुखी असा त्रास सुरु झाला. त्यांना तातडीने धानोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सध्या जिल्हा रुग्णालयात ४७ विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून उर्वरित ७६ जण धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान, या घटनेने आश्रमशाळेत स्वयंपाक बनविताना निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.