शाकाहारी ग्राहकांसाठी झोमॅटोची विशेष सेवा
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खवय्यांचे आवडते पदार्थ घरपोच आणून देण्यासाठी २४x७ कार्यरत असलेली Zomato ही फूड डिलिव्हरी सेवा नेहमीच अद्ययावत राहत अधिक चांगली सेवा देण्यास तत्पर असते. आपल्या देशात शाकाहारी लोकांची संख्या खूप मोठी आहे. गेल्या काही वर्षांपासून मांसाहार सोडून शाकाहाराकडे वळणारा वर्गही वाढत आहे. ही संधी लक्षात घेऊन अशा शाकाहारी ग्राहकांसाठी फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोने मोठा निर्णय घेतला आहे. झोमॅटोने आपला ‘प्युअर व्हेज मोड’ आणि ‘प्युअर व्हेज फ्लीट’ या दोन नवीन सेवा भारतातील शाकाहारी नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लॉन्च केल्या आहेत. झोमॅटोचे फाउंडर आणि सीईओ दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबद्दलची घोषणा केली आहे.
दीपंदर गोयल म्हणाले की, ग्राहकांचे त्यांच्या आहारातील प्राधान्याक्रम लक्षात घेऊन, आम्ही आज झोमॅटोवर ‘प्युअर व्हेज फ्लीट’ सोबत ‘प्युअर व्हेज मोड” लाँच करत आहोत, ज्या ग्राहकांचे 100 टक्के शाकाहारी आहार हे प्राधान्य आहे त्यांच्यासाठी ही सर्व्हिस असेल.
गोयल म्हणाले की देशातील शाकाहारी लोकांकडून मिळालेला फीडबॅक लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली आहे. जगाच्या तुलनेत भारतात शाकाहारी लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे, आणि त्यांचे अन्न कसे शिजवले जाते किंवा कसे हाताळले जाते याबद्दल ते अतिशय आग्रही आहेत. आम्हाला ग्राहकांकडून मिळालेला प्रत्येक अभिप्राय महत्त्वाचा आहे, असेही गोयल यावेळी म्हणाले.
झोमॅटोने सुरू केलेल्या प्युअर व्हेज मोडमधील रेस्टॉरंट्समध्ये फक्त शाकाहारी जेवण बनवणाऱ्या आणि सर्व्ह करणाऱ्या आउटलेटची यादी असेल. प्युअर व्हेज मोडमध्ये फक्त शुद्ध शाकाहारी जेवण देणाऱ्या रेस्टॉरंट्सचा समावेश असेल आणि कोणत्याही मांसाहारी पदार्थाची सेवा देणारी सर्व रेस्टॉरंट वगळली जातील असेही गोयल यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले. गोयल यांनी मात्र नव्याने सुरू केलेली सेवा कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय आवडीनिवडींमध्ये भेदभाव करत नाही, असेही नमूद केले.
SL/ML/SL
19 March 2024