AI मुळे झोमॅटो करणार ६०० कर्मचाऱ्यांची कपात
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील आघाडीची ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने (Zomato) आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कर्मचारी कपात प्रामुख्याने कंपनीच्या ग्राहक सेवा विभागात झाली असून, यामागे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वाढता वापर आणि फूड डिलिव्हरी व्यवसायातील मंदी हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे गुरुग्राम आणि हैदराबाद येथील कार्यालयांतील कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. ही घटना 2025 मधील भारतीय नवउद्योग क्षेत्रातील एक मोठी कर्मचारी कपात मानली जात आहे. कंपनीने या निर्णयासाठी खराब कामगिरी आणि शिस्तभंगाचे कारण दिले आहे.
झोमॅटोच्या या निर्णयामुळे प्रभावित कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे, तसेच ऑटोमेशनमुळे रोजगारांवर होणाऱ्या परिणामांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. झोमॅटोने सुमारे एक वर्षापूर्वी ‘झोमॅटो असोसिएट अॅक्सिलरेटर प्रोग्राम’ (ZAAP) अंतर्गत 1,500 कर्मचाऱ्यांना ग्राहक सेवा विभागात कामावर घेतले होते. या कर्मचाऱ्यांना कंपनीने विक्री, ऑपरेशन्स, प्रोग्राम मॅनेजमेंट, सप्लाय चेन आणि इतर विभागांमध्ये बढती देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या पैकी 600 कर्मचाऱ्यांचे करार नूतनीकरण न करता त्यांना कामावरून काढण्यात आले.
SL/ML/SL
1 April 2025