Zepto ला धक्का, FDA ने निलंबित केला अन्न परवाना
मुंबई, दि. ३ : धारावी येथील डार्क स्टोअरमध्ये असलेल्या Zepto युनिटमध्ये अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि खराब स्वच्छता व्यवस्था आढळल्यानंतर महाराष्ट्र FDA ने कडक कारवाई केली आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म Zepto ची मूळ कंपनी किरणकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड चा अन्न व्यवसाय परवाना निलंबित केला आहे.
एफडीए तपासणी अहवालात असे दिसून आले की, स्टोअरमधील काही अन्न उत्पादने बुरशीयुक्त होती. तर अनेक वस्तू गोठलेल्या घाणेरड्या पाण्याजवळ ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय, शीतगृहाची निर्धारित तापमान मर्यादा पाळण्यात आली नाही आणि कालबाह्य झालेले उत्पादने उर्वरित स्टॉकपासून वेगळी ठेवण्यात आली नाहीत. एफडीएने म्हटले आहे की, कंपनीने त्यांच्या अन्न व्यवसाय परवान्याच्या अटींचे पालन केले नाही. आवश्यक सुधारणा होईपर्यंत आणि विभागाला समाधानकारक पुरावे प्रदान होईपर्यंत परवाना निलंबित राहील.
Zepto चा खुलासा
झेप्टोच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देतो. आम्ही अंतर्गत आढावा सुरू केला आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत. सर्व मानकांचे पालन करून शक्य तितक्या लवकर कामकाज पुन्हा सुरू करणे हे आमचे ध्येय आहे.