महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे….

मुंबई दि. १ — महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची तर महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयच्या अध्यक्षपदी सागर साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी आज नवी दिल्ली येथे शिवराज मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली.
शिवराज मोरे यांनी महाविद्यालयीन जीवनात एनएसयूआई पासून राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली. एनएसयूआईचे दोन वेळा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे निवडून येण्याचा विक्रम केला. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळेच एनएसयूआईचे राष्ट्रीय महासचिव म्हणून त्यांना बढती मिळाली. त्यांनी ८-९ राज्यांमध्ये संघटन विस्ताराचे काम प्रभावीपणे पार पाडले. त्यानंतर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव, उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि राज्यभर युवकांचे मजबूत संघटन उभे केले.
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथील सागर साळुंखे गेल्या काही वर्षांपासून एनएसयुआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत आहेत. विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आंदोलने केली आहेत.
या नियुक्तीनंतर बोलताना शिवराज मोरे म्हणाले, “युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यातील तरुणांचे संघटन करून त्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर ठोस आंदोलन उभारले जाईल. शिक्षण, नोकरी, आणि महागाई यांसारख्या मुद्द्यांवर युवकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आम्ही लढा उभारू. केंद्र आणि राज्यातील भाजपा युती सरकार युवकविरोधी असून, त्यांच्या अन्यायकारक धोरणांचा निर्णायक विरोध करण्यासाठी युवक काँग्रेस कटिबद्ध आहे. तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही निर्धारपूर्वक काम करणार आहोत. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी आपल्यावर जो विश्वास टाकला आहे तो आपण सार्थ करू असे मोरे म्हणाले. ML/ML/MS