जागतिक युवा कौशल्य दिन: जागतिक शांततेसाठी युवाशक्तीला विधायक कार्याकडे वळवण्याची गरज
मुंबई, दि. 15 (राधिका अघोर ) :आज जागतिक युवा कौशल्य दिन आहे. यंदाच्या युवा कौशल्या दिनाची संकल्पना ‘शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्ये’ अशी आहे. अत्यंत दुर्दैवी योगायोग म्हणजे, कालच, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि हल्ला करणारा तरुण, केवळ 20 वर्षांचा सुशिक्षित युवा होता. शालेय आयुष्यात गणित आणि विज्ञानात उत्तम कामगिरी करणारा हा युवा आपल्या तारुण्यात इतका भरकटला, की अशा जीवघेण्या हल्ल्यासाठी तयार झाला, आणि दुर्दैवाने त्याला आपला जीव गमवावा लागला. जगभरात अलीकडे घडणाऱ्या काही घटना, महाराष्ट्रात घडणाऱ्या हिट अँड रनच्या घटना, अशा भरकटलेल्या युवकांचं विदारक चित्रच आपल्यासमोर मांडतात. जागतिक युवा कौशल्य दिनाचे महत्त्व आपल्याला यातूनच कळतं. युवावस्था सर्वाधिक हळवी आणि आकांक्षा असलेली अवस्था असते. शिक्षण घेऊन स्वतःसाठी, कुटुंबसाठी समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी असते आणि जबाबदारीही. मात्र केवळ केवळ शिक्षण रोजगार मिळवून देण्यासाठी पुरेसे नसले, की त्यातून येणारे नैराश्य अत्यंत घातक असते. म्हणूनच, सुशिक्षित, अर्धशिक्षित आणि अशिक्षित युवकांनाही, विधायक कामांशी जोडून घेण्यासाठी, शिक्षणाला कौशल्याची जोड अत्यंत आवश्यक आहे. आजच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत तर ती महत्वाची गरज ठरली आहे. हाच विचार करून, जगभरात कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी, 2014 साली संयुक्त राष्ट्रांनी, 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज जग अनेक आव्हानांचा सामना करत आहे. आणि त्यातल्या अनेक संकटांचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम युवकांवर होत असतो. सामाजिक आणि आर्थिक विषमतेतून संधी न मिळणे हे ही निराशा निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते. यासाठीच, ज्याला जे आवडेल, जे येईल, ते कौशल्य शिकवणे, म्हणजे ही युवा शक्ती विधायक कामांकडे वळवणे, यातून स्थैर्य तर येईलच, शिवाय जगाला अपेक्षित असलेली शांतता निर्माण करण्यात देखील त्यांचे योगदान महत्वाचे ठरेल. म्हणूनच, जगात शांतता निर्माण करण्याची युवा शक्तीची क्षमता ओळखून तिला बळ देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकवटण्याची गरज आहे. युवकांना कौशल्ये देण्यासाठी, निधी उभा करणे, अशा कौशल्य देणाऱ्या संस्था स्थापन करणे, आधीपासून असलेल्या संस्थांना अद्ययावत करणे, अशा सगळ्या गोष्टींसाठी काम करण्याची गरज आहे. अविकसित आणि विकसनशील, तसेच भारतासारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या देशात, बेरोजगारीचा प्रश्न अधिक बिकट आहे. सगळ्यांनाच सेवा क्षेत्रात सामावून घेणे शक्य नाही, आणि कृषी क्षेत्रातही अनेकांना रोजगार, आर्थिक स्थैर्य देण्याची क्षमता नाही. त्यामुळे, युवकांना उद्योग क्षेत्रात काम करता येईल, किंवा इच्छा असल्यास स्वयंउद्योजक होता येईल, याचे कौशल्य त्यांना देणे आवश्यक आहे. यातला कळीचा मुद्दा म्हणजे, समाजात, आर्थिक जगतात, ज्या कौशल्याला मागणी आहे, ज्याची गरज आहे, ते ओळखून त्यानुसार कौशल्य प्रशिक्षणाची सांगड घालणे, तसेच नोकरी देणाऱ्या कंपन्या, उद्योजकांच्या अपेक्षा समजून घेत, त्यानुसार युवकांना कौशल्य-प्रशिक्षित केले, तर त्या कौशल्याचा त्यांना रोजगार मिळण्यासाठी उपयोग होऊ शकेल. जे आधीच नोकरी व्यवसाय करत आहेत, त्यांनीही नवे तंत्रज्ञान आत्मसात करत, स्वत:ची कौशल्ये त्यानुसार वाढवणे आवश्यक आहे. यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे. भारतात कौशल्य विकास मंत्रालय यासाठी विविध उपक्रम राबवत असते. युवाशक्तीला कुशल करत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, यामुळे शक्य होईल. यात तंत्रशिक्षण संस्था आणि व्यावसायिक क्षेत्रांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. संयुक्त राष्ट्रांनी आपल्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये युवा वर्गाला 2030 पर्यंत कौशल्य विकसित करण्याचेही उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी साधन म्हणून अशा तंत्रशिक्षण संस्थांचाच वापर करता येईल. त्यादृष्टीने आयटीआय सारख्या जुन्या संस्थांनी अद्ययावत आणि कार्यकुशल होण्याची व्यवस्था करायला हवी. जगभरातल्या युवकांना रोजगार मिळावा, यासाठी येत्या 15 वर्षात आपल्याला 600 दशलक्ष नवे रोजगार निर्माण करण्याची गरज असल्याचे, एका अहवालात म्हटले आहे. भारत युवा लोकांचा देश असल्याकारणाने, भारतासमोरचे आव्हान अधिकच गंभीर आहे. एकीकडे अनेक ठिकाणी चांगल्या कुशल लोकांची वानवा आणि दुसरीकडे अनेक युवकांना रोजगार नाही, असे विरोधाभासी चित्र आपल्याला भारतात दिसते. हे चित्र बदलायचे असेल, तर आपल्याला रोजगार आणि कौशल्ये यांची सांगड घालावीच लागेल. आज नोकऱ्या आणि रोजगार यांच्या मध्ये जर सर्वात मोठा अडथळा कुठला असेल, तर तो, कौशल्याचा अभाव हाच आहे. म्हणूनच, कौशल्ये अत्यंत महत्वाची ठरतात. जगभरात शांतता, जागतिक नागरिकत्वाची संकल्पना आणि शाश्वत विकास साधायचा असेल, तर युवकांसाठी एक समान आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. आणि कौशल्यविकास हा या उद्दिष्टप्राप्तीचा राजमार्ग आहे.
ML/ML/PGB 15 July 2024