आंतरराष्ट्रीय युवा दिन : डिजिटल क्रांतीत युवाशक्तीचा विधायक वापर आवश्यक
मुंबई, दि. 12 (राधिका अघोर) : जगभरात 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. माणूस अधिराज्य गाजवत असलेल्या या पृथ्वीवर युवा शक्तीचं महत्त्व सगळ्यांनीच मान्य केलं आहे. युवा म्हणजे चैतन्य, युवा म्हणजे उत्साह, जिद्द, काहीतरी करण्याची, जग जिंकण्याची वृत्ती. ज्यांच्याकडून सर्वाधिक अपेक्षा ठेवल्या जाऊ शकतात, असा वयाचा टप्पा, आणि जिथे भरकटण्याची शक्यता असते, असाही टप्पा. या युवाशक्तीचा विधायक कामांसाठी उपयोग करण्यासाठी, त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
2010 पासून हा दिवस साजरा केला जातो आहे. यंदाच्या युवा दिनाची संकल्पना आहे, “फ्रॉम क्लिक्स टू प्रोग्रेस : युथ डिजिटल पाथवेज फॉर सस्तेनेबल डेवलपमेंट म्हणजेच डिजिटल साधनांचा मनोरंजनापासून ते शाश्वत विकासासाठी उपयोगाचा प्रवास. युवकांची क्षमता, त्यांची कामगिरी आणि जगभरात ते देत असलेले योगदान लक्षात घेण्याचा हा दिवस आहे.
जेव्हा जग डिजिटल होण्याच्या दिशेनं प्रवास करत आहे, अशा वेळी, त्याचे सर्वात मोठे माध्यम युवाशक्तीच असू शकते, हेच ही संकल्पना सांगत आहे. डिजिटल साधने, मग ते मोबाइल असोत, किंवा लॅपटॉप, किंवा मग डिजिटल माध्यमातून मिळणाऱ्या सेवा पासून ते कोडिंग आणि एआय- म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता अशा सगळ्यांवर युवकांचे प्रभुत्व असते. मात्र, ही सगळी साधने, ह्या सेवा केवळ मनोरंजनासाठी आहेत का? तर त्यापुढे सगळ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, जगाच्या शाश्वत विकासासाठी, ह्या डिजिटल साधनांचा कसा वापर करता येईल, याचा विचार या संकल्पनेमागे आहे. त्यासाठी युवकांची गरज आहे.
आजही जगाचा मोठा भाग असा आहे, जिथे डिजिटल साधने पोहोचली नाहीत, अविकसित आणि विकसनशील देशात अद्याप मूलभूत सुविधा पोचल्या नाहीत. अशा सर्व देशात, अत्यंत कमी खर्चात, लोकांचे जीवनमान सुधारण्याचा उपाय म्हणजे डिजिटल क्रांती. आणि या क्रांतीचे दूत म्हणून युवाशक्ती काम करु शकते.
अविकसित आणि विकसनशील देशांत युवकांनाही पुरेशी साधने मिळू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचा आणि पर्यायाने देशाचाही विकास खुंटतो. हे लक्षात घेऊन, ही दरी कमी करण्यासाठी विकसित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना त्यात योगदान देतात.
आज डिजिटल जाग, चौथी क्रांती घेऊन आले आहे, ही क्रांती संपूर्ण नवे जग निर्माण करणार आहे. त्याचा एकीकडे शाश्वत विकासासाठी वापर करणे हा विधायक भाग, आणि डिजिटल साधनांच्या गर्दीत युवकांनी हरवून जाऊ नये, भरकटू नये हा दुसरा भाग ह्या दोन्हींमध्ये ताळमेळ साधण्याचं मोठं आव्हान आज जगापुढे आहे.
गेल्या काही वर्षात मोबाईल हातात आल्यापासून, त्याचं व्यसन लागण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. मग व्हिडिओ गेम्स असोत, रिल्स असोत किंवा टिकटॉक सारखे प्रकार, ज्यात युवक भरकटत जातात. कधी नैराश्य तर कधी आत्महत्येपर्यंत गोष्टी जातात. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. तर सायबर गुन्हे, डार्क वेब ही देखील मोठी डोकेदुखी ठरली आहे.
दुसरीकडे एआय, इंटरनेट ऑफ थिंग्ज अशा तंत्रज्ञानामुळे अनेकांचे रोजगार ही जाण्याची भीती आहे. एकीकडे नोकऱ्या असणे मात्र नोकरी करण्याचे कौशल्य नसल्याने बेरोजगार युवांची वाढती संख्या ही देखील खूप मोठी समस्या आहे.
भारतासारख्या देशात तर 60 टक्क्यांच्या वर युवाशक्ती आहे. या शक्तीचा चांगला आणि विधायक दिशेने वापर केल्यास, 25 वर्षात विकसित देश होण्याचं स्वप्न साकार करणं भारताला अशक्य नाही. ही 25 वर्षे युवकांना स्वतःचे आणि देशाचेही भविष्य घडवण्यासाठी खर्ची घालावी लागतील. त्यासाठी इतर सगळी व्यवधाने बाजूला ठेवून, डिजिटल जगाचा जास्तीत वापर स्वतः साठी आणि नंतर सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी करावा लागेल.
या सगळ्यासाठी आधुनिकतेचा प्रवास करतांना एक गोष्ट आपल्याला जोडावी लागेल ती म्हणजे आपला भारतीय पाया मजबूत ठेवणे. आपल्या पायापासून दूर गेलेली माणसं भरकटत जातात. ते टाळायचे असेल,तर आधी मुळे पक्की करावी लागतील, मग भरारी घेता येईल.
युवा हा शब्द केवळ संख्या म्हणून वय सांगणारा नाही, तर मानसिक शक्ती सांगणारा आहे. ज्याची मनोवृत्ती आणि प्रकृती युवा, तो शरीरानेही युवा आणि कार्यरत.. जगभरातल्या सर्व युवकांना सुदृढ शरीर, निरोगी मन आणि भविष्याकडे झेप घेणारी बुध्दी मिळो, ह्याच शुभेच्छा !!
ML/ML/PGB
12 Aug 2024