युगादी अर्थात ‘ अक्षय्य तृतीया ‘

 युगादी अर्थात  ‘ अक्षय्य तृतीया ‘

मुंबई, दि. 10 (जाई वैशंपायन) : आज वैशाख शुद्ध तृतीया, म्हणजेच अक्षय्य तृतीया. भारतीय संस्कृतीत साडेतीन शुभमुहूर्त महत्त्वाचे मानले जातात. त्यापैकी अक्षय्य तृतीया हा साडेतिनावा म्हणजे अर्धा शुभमुहूर्त होय. चार युगांपैकी त्रेतायुगाची सुरुवात या दिवशी झाल्याचे मानले जाते, त्यामुळे या तिथीला ‘युगादी’ असेही म्हणतात. जसे विजयादशमीला शस्त्रपूजन, दीपावलीत दिवे, तसे आजच्या दिवशी ‘दान’ महत्त्वाचे असते. भारतीय परंपरांमध्ये समाजवस्त्राचा फार खोलवर विचार केलेला दिसतो. विविध सणावारांना पाळल्या जाणाऱ्या रूढींना सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टीनेही अर्थ असतो. भारतीय मनाला शाश्वततेचा/ संतुलिततेचा (sustainability) विचार जसा नवीन नाही, तसा सामाजिक न्यायाचा/ साधनसंपत्तीच्या वितरणाचा विचारही अपरिचित नाही.

अगदी दररोज काढून ठेवला जाणारा काकबली असेल, गोग्रास असेल, किंवा गुढीपाडव्यापासून घराबाहेर पाण्याचा माठ भरून ठेवायची प्रथा असेल- आपल्याबरोबर सभोवताली असलेल्या पशुपक्ष्यांच्या उदरभरणाची, तृषाशमनाची काळजी घेण्याची वृत्ती किती रुजलेली दिसते ! तीच गोष्ट अक्षय्य तृतीयेची ! ही पितृतिथी मानली जात असल्याने, या दिवशी आपल्या कुळातील दिवंगत पितरांचे स्मरण करून आवर्जून दानधर्म केला जातो. हेतू हा, की त्या निमित्ताने काही गरजूंना तात्पुरता का होईना दिलासा मिळावा, नि त्याचवेळी, दान देणाऱ्याच्या मनातही कृतज्ञतेची भावना असावी.

आजच्या तिथीला प्रेमादरपूर्वक सात्त्विक संपत्तीचे यथाशक्ती दान करणाऱ्यांना त्या दानाचे अक्षय्य – म्हणजे कधीही क्षय न पावणारे, कधीही कमी न होणारे – पुण्य मिळते, असे परंपरा म्हणते. ज्ञानेश्वर माऊलींनी दानाचेही तीन प्रकार सांगितले आहेत- सात्त्विक, राजस आणि तामस. ‘प्रामाणिकपणे आणि स्वधर्मानुसार मिळालेल्या आपल्या कष्टार्जित संपत्तीतून निरपेक्ष भावनेने केले जाते, तेच दान सात्त्विक होय. तीर्थक्षेत्री, सुयोग्य आणि गरजू व्यक्तीला, मनात अहंकाराचा लवलेशही नसताना, आढ्यतेची भावना न ठेवता, तसेच परतफेडीची/मोबदल्याची अपेक्षा न बाळगता जे दान केले जाते तेच सात्त्विक दान होय. आपल्या संतांनी असे सात्त्विक दानच श्रेष्ठ मानले असून, आजच्या दिवशी त्याचेच महत्त्व असते.

अक्षय्य तृतीया उन्हाळ्यात येत असल्यामुळे, उष्णताशामक गोष्टींचे दान करण्याची आपली अर्थवाही पद्धत आहे. त्यामुळे या दिवशी पाण्याचा माठ, छत्री, वस्त्र, पंखा, पन्हे अशा गोष्टी आवर्जून दिल्या जातात. आपल्या गाठीशी पुण्य जमा करतानाच समाजाची काळजी घेण्याचा विचार यात दिसतो, आणि दिवसेंदिवस अधिकाधिक स्वार्थमूलक तसेच आत्मकेंद्रित होत चाललेल्या आजच्या जगात तो फार महत्त्वाचा आहे.

आजच्या दिवशी भक्तिभावाने देवासमोर जी वस्तू ठेवू तिची अनेक पटींनी वाढ होते, अशी समजूत आहे. त्यासाठी लोक सोनेनाणे वगैरे ठेवतात. आपल्याकडील धनसंपदा अक्षय्य राहावी अशी इच्छा सांसारिक माणसांसाठी रास्तच आहे, परंतु त्याबरोबरच वर म्हटल्याप्रमाणे, सामाजिक/ पर्यावरणीय भानही राखण्याची जोड दिली तर उत्तम! सध्या पाणीटंचाईचे भीषण वास्तव, आपल्यासमोर येऊ लागले आहे. भविष्यात पाण्यावरून महायुद्ध होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.. असे असताना, ‘आपले जलस्रोत अक्षय्य राहावेत’ अशी प्रार्थना आणि त्या दृष्टीने कृती आवश्यक नाही काय? यास्तव, अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने, मोठ्या पात्रात पाणी भरून ठेवून आपण चांगल्या पावसाची, नदी-ओढे-तलाव भरून जाण्याची, भूजल पातळी वाढण्याची प्रार्थना केली पाहिजे. अर्थात, हात जोडण्याबरोबर कृतीचीही जोड दिली- पाणी जपून वापरले, शक्य तिथे त्याचा पुनर्वापर केला, पाण्याला जमिनीत मुरू दिले- तरच ती प्रार्थना सफल होईल. लदाखमध्ये सर्वत्र भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर सात पात्रांमध्ये पाणी भरून ठेवण्याची पद्धत आहे. श्रीमंत असो की गरीब, नैवेद्यस्वरूपात पाणी ठेवणे सर्वांना शक्य आहे, हा त्यामागचा विचार. तोच विचार पुढे नेत आपणही पाणी वाचवून सृष्टीला ‘जलदान’ देऊया… तेच अक्षय्य होऊन ‘जीवन’ रूपाने आपल्यापर्यंत निश्चितच येईल आणि सर्व जीवसृष्टीचे कल्याण होईल !

याच सत्संकल्पासह अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा ! Yugadi means ‘Akshaya Tritiya’

ML/ML/PGB
10 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *