Instagram वर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची कमेंट करणाऱ्या तरुणीला अटक

पुणे, दि. १० : भारत-पाक युद्धस्थिती दरम्यान सोशल मिडियावर बेतालपणे ‘पाकिस्तान जिंदाबाद’ ची घोषणा देणाऱ्या पुण्यातील युवतीला आता पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इन्स्टाग्रामवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी कमेंट केल्याबद्दल पुणे शहर पोलिसांनी एका १९ वर्षीय विद्यार्थीनीला अटक केली आहे. शुक्रवारी कोंढवा पोलीस ठाण्यात हवालदार सुभाष जरांडे यांनी याबद्दल एफआयआर दाखल केला. त्यानंतर पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी विद्यार्थीनीला अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला, तसेच पुढील तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.
पुण्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीला अटक करून तिच्यावर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम १५२. १९६१९७, २९९.३५२. ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाची सुरुवात झाल्यानंतर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सोशल मीडियावर तपास यंत्रणा करडी नजर ठेवून आहेत. खोटा नरेटिव्ह पसरविणाऱ्या आणि भारत किंवा लष्कराविरोधात भूमिका मांडणाऱ्या अनेक खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एक्सवरील तब्बल ८००० खाती केंद्र सरकारच्या आदेशानंतर बंद करण्यात आली आहेत.