राज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यात भव्य पक्षप्रवेश

रत्नागिरी दि ४:– खेड तालुक्यातील विविध गावांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ३ मे २०२५ रोजी भरणे नाका, खेड येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश रामदास कदम आणि शिवसेना उपनेते संजयराव कदम प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवसेनेची संघटनात्मक भूमिका, कार्यपद्धती आणि स्थानिक विकासाची दिशा यावर सविस्तर चर्चा झाली.
या प्रसंगी राज्यमंत्री योगेश कदम यांनी जनतेशी थेट संवाद साधताना सांगितले “गावागावांत ठोस विकासकामे व्हायलाच हवीत. रामदास भाई आमदार असताना संपूर्ण तालुका शिवसेनेच्या नेतृत्वाखाली होता—ग्रामपंचायती, नगरसेवक, जिल्हा परिषद सर्वत्र आपलेच लोक होते. तोच आत्मविश्वास, तोच जोश पुन्हा निर्माण करायचा आहे. मी मंत्री झालोय, पण त्या आधी तुमच्यामुळे आमदार झालो. आजही तुमच्या विश्वासावरच उभा आहे. माझ्या मतदारसंघातील कोणत्याही गावाला मी कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही मला साथ दिली, तर ही साथ मी कधीच सोडणार नाही.”
खेड तालुक्यातील चाटव, आंबवली, वाडी बीड, नांदवली, किंजळे, हुंबरी वरची व खालची वाडी, मालेद या गावांतील विविध उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये विश्वासराव कदम (विभागप्रमुख), संजय यादव गुरुजी (विभाग संघटक), राजू शेठ पाटणे (विभाग संपर्कप्रमुख), सखाराम कदम – चाटव (शाखाप्रमुख), चंद्रकांत भाऊ कदम (माजी विभागप्रमुख), काशिनाथ खोत कदम – वाडी बीड (शाखाप्रमुख), श्रीपत चव्हाण व दिनेश चव्हाण – माळदे (उपशाखाप्रमुख), मनोहर खोत कदम – हुंबरी (उपसरपंच), अनंत यादव – आंबवली (शाखाप्रमुख), सुरेशराव मोरे – किंजळे (शाखाप्रमुख), दिलीपराव कदम – हुंबरी (उपशाखाप्रमुख), सौ. सुषमा कदम – हुंबरी (माजी पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य), सौ. सुजाता कदम (ग्रामपंचायत सदस्य) आणि शामसुंदर रघुनाथ कदम – तिसंगी (शिवाजीनगर शाखाप्रमुख) यांचा समावेश होता.
या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय वातावरणात नवऊर्जा निर्माण झाली असून, स्थानिक विकासकामांना नवी गती मिळेल, अशी भावना ग्रामपातळीवर व्यक्त होत आहे.