विरोधकांकडूनही आमदार योगेश कदम यांच्या कामाचे कौतुक

रत्नागिरी दि. १६ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल टाकेडे येथे हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी फाऊंडेशन संचालित ‘मिलन’ वृद्धाश्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले काँग्रेस नेते भाई जगताप यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यपद्धतीचे सार्वजनिकरित्या कौतुक करत सकारात्मक राजकारणाचा आदर्श घालून दिला.
“या मतदारसंघाचे नेतृत्व रामदासभाई कदम यांनी केलं. आता त्यांचे चिरंजीव योगेश कदम दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. आमचा नात्यातला पुतण्या असला तरी कामाच्या बाबतीत मी ही गोष्ट पक्ष विरहित सांगतो आहे. वरच्या सभागृहात नवीन आलेले सदस्य चाचपडताना दिसतात, मात्र योगेश कदम यांनी कायदा-सुव्यवस्था, महसूल असे अनेक विषय समजून घेत उत्तम प्रकारे मांडले. त्यांची तयारी आणि स्पष्टता लक्षणीय आहे,” असं जगताप यांनी म्हटलं.
या प्रशंसेमुळे उपस्थितांमध्ये राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन काम करणाऱ्या नेतृत्वाची चर्चा रंगली. सार्वजनिक व्यासपीठावर विरोधी पक्षातील नेत्याकडून मिळालेलं हे कौतुक राजकीय परिपक्वतेचं आणि योगेश कदम यांच्या कार्यशैलीवरचा विश्वास वाढवणारे मानलं जात आहे. ML.MS