येवले अमृततुल्यची ठाम भूमिका – आम्ही कोणताही कायदा मोडलेला नाही”

मुंबई, दि १५: पुण्याचा सुप्रसिद्ध चहाब्रँड ‘येवले अमृततुल्य’ यांच्याविरोधात शेमारू एंटरटेन्मेंट कंपनीने दाखल केलेली तक्रार ही पूर्णपणे खोडसाळ आणि दिशाभूल करणारी असल्याचे येवले अमृततुल्यच्या संचालकांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात येवले अमृततुल्य प्रा. लि. कंपनीच्या वतीने एमआयडीसी पोलिसांना अधिकृत उत्तर देण्यात आले असून, कंपनीने कोणताही कायदा न मोडल्याचे ठामपणे सांगितले आहे.
येवले अमृततुल्यच्या संचालकांनी दिलेल्या लिखित उत्तरात म्हटले आहे की, शेमारू कंपनीने ज्या चित्रपटांच्या क्लिप्सचा उल्लेख केला आहे, त्या चित्रपटांवरील त्यांचा प्रताधिकार (कॉपीराइट) सिद्ध करण्यासाठी कोणतेही कायदेशीर दस्तऐवज सादर केलेले नाहीत. त्याचप्रमाणे सदरील पोलीस तक्रार दाखल करण्यापूर्वी आम्ह्चे कायदेशीर सल्लागार रेड्डी अँड रेड्डी लॉ फर्म पुणे यांच्या मार्फत सदरची कॉपी राईट्स दस्तऐवज यांची मागणी शेमारू यांचे कडे केली होती परंतु सदरील दस्तऐवज न देता पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यावरून असे स्प्ष्ट होते कि शेमारू कडे असा कोणताही कॉपी राईट्स चा अधिकार नाही.
सदरील कायदेशीर प्रतिउत्तर व वेळोवेळी आमचे कायदेशीर सल्लागार यांनी संबंधित पोलिसांना या बाबत स्पष्टीकरण आणि माहिती दिलेली आहे.
कंपनीने पुढे स्पष्ट केले आहे की, सदर पोस्ट किंवा ‘मिम’ हे केवळ समीक्षा, टिप्पणी अथवा चालू घटनांवरील विनोदी प्रतिक्रिया म्हणून समाजमाध्यमावर पोस्ट करण्यात आले होते, त्यामुळे ते कलम 52, कॉपीराइट कायदा 1957 अंतर्गत सूटप्राप्त वापरात येते. त्यामुळे ही कोणतीही कॉपीराइट उल्लंघनाची बाब नाही.
येवले अमृततुल्यच्या वतीने सांगण्यात आले आहे की, “सदर पोस्ट आधीच हटवण्यात आलेली असून कोणत्याही प्रकारचा गैरवापर किंवा व्यावसायिक फायदा यामध्ये झालेला नाही. शेमारू कंपनी सध्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी तसेच ऐन कैन प्रकारे पैसे उकळण्यासाठी अशा खोट्या तक्रारी करत आहे. आम्ही कायद्याचे पालन करणारी कंपनी आहोत आणि कोणत्याही प्रकारे कुणाच्याही हक्कांवर गदा आणलेली नाही.”
कंपनीने पोलिसांकडे विनंती केली आहे की, शेमारूची ही तक्रार “खोटी, निराधार आणि दबाव आणण्यासाठी केलेली आहे,” त्यामुळे ती फेटाळून लावावी.
सदरील प्रकरणाची संपूर्ण वस्तुनिष्ठ माहिती व मा. न्यायालयाच्या रेकॉर्ड किंवा संबंधित पोलीस आणि आमच्या कंपनी कडून न घेता सदरील बातमी वर्तमानपत्रात छापण्यात आलेली आहे. हि बाब अतिशय खेदजनक व बदनामीकारक आहे. तसेच कंपनीला व कंपनीच्या प्रतिष्टेसाठी हानिकारक आहे. KK/ML/MS