मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा,मगच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या

 मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा,मगच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या

मुंबई, दि.१५ :- २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला होता. याच चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर निवडणुका पारदर्शक होणार नाही. त्यामुळे सदोष मतदार याद्यांची तपासणी करून त्या दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाला केली. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची आज विरोधी पक्षांनी भेट घेऊन चर्चा केली.

आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांना मतदार यादीतील अनंत चुका पुराव्यानिशी दाखवण्यात आल्या. या बैठकीत जयंत पाटील यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत. काही मतदार नोंद असलेल्या पत्त्यावर राहत नाही. घर क्रमांक चुकीचे आहेत. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवले गेले आहेत. नाशिक मध्ये एकच घरात ८१३ मतदारांची नोंद आढळली.

नालासोपारा मतदारसंघातील सुषमा गुप्ता या महिलेचे नाव ६ वेळ वेगवेगळ्या EPIC ID सह असल्याचे १२ ऑगस्ट रोजी विविध न्यूज चॅनलच्या बातम्यांमध्ये पुराव्यासह प्रसिद्ध केले गेले. त्यानंतर ते नाव हटवले गेले. हे नाव कोणी हटवले? हे नाव हटवण्याची तक्रार कोणी केला असा प्रश्न जयंत पाटील यांनी आयोगाला विचारला. आमचा असा समज झाला आहे की, राज्य किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर महाराष्ट्रात दुसरा कुणीतरी चालवतो असा गंभीर आरोप त्यांनी केला.

निवडणुकीत मतदान झाल्यावर किती पुरुषांनी आणि महिलांनी मतदान केलं या याद्या दर तासाला जाहीर होतात. पण विधानसभेला ही सिस्टीम मोडण्यात आली. कोणी किती मतदान केलं हे दोन दिवसानंतर जाहीर करण्यात आले. हे पारदर्शक प्रक्रियेच्या विरोधात आहे. नुकताच शिंदे गटाच्या आमदाराने जाहीरपणे सांगितले की, २० हजार मतदार बाहेरून आणले त्यामुळे विजय झाला. या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीरपणे दखल घ्यावी, मतदार कसे आले याची चौकशी करावी अस पाटील म्हणाले.

मतदान यादीत सोयीनुसार बदल होत आहेत, याची तक्रार आम्ही निवडणुकीच्या महिनाभरापूर्वी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. लोकशाही ही थट्टा आम्ही खपवून घेणार नाही. महत्वाचे म्हणजे आमच्या सर्व प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन निवडणूक आयोगाने करावे. त्यावर भारतीय जनता पक्षाने व्यक्त होणं आम्हाला अभिप्रेत नाही असा टोला ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारयादीत घोळ झाले होते,त्याची तक्रार आम्हीच करून देखील कारवाई झालेली नाही. आता तीच यादी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर या निवडणुका पारदर्शक असणार नाहीत. देशपातळीवर राहुल गांधी यांनी हाच मुद्दा मांडला आहे पण निवडणूक आयोग जबाबदारी झटकत आहे. निष्पक्ष निवडणुका झाल्या नाही तर हा लोकशाहीला मोठा धोका असल्याची टीका थोरात यांनी केली.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मतदारयादीतील मतदार आणि त्यांच्या वडिलांचे वय यातील तफावत दाखवली. मतदारांचे वय आणि त्यांच्या वडिलांच्या वयातील तफावत पाहता कोण कोणाचे वडील आहेत हा प्रश्न त्यांनी उपस्थित होतो असा टोला राज ठाकरे यांनी मारला. राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मतदार यादी दाखवत नाही इथेच घोळ आहे अशी टीका ही राज ठाकरे यांनी केली.

यावेळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी हे कठपुतली आहेत का असा सवाल उपस्थित केला.
कोणतेही प्रश्न विचारले तरी निवडणूक आयोगातील अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहे.आज झालेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे आमचे लक्ष आहे.त्यानंतर आम्ही भूमिका स्पष्ट करू अस ठाकरे म्हणाले.

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी राजुरा मतदारसंघातील घोळाबाबत माहिती दिली. या मतदारसंघात भाजप नेत्याच्या मोबाईलवर ओटीपी आला, तो कसा? याबाबत आम्ही तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचे काम भाजपाचा पदाधिकारी असलेला व्यक्ती देवांग दवे काम करत होता,त्याला कंत्राट मिळाले होते असा ही आरोप त्यांनी यावेळी केला.

यावेळी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. अरविंद सावंत, बाळा नांदगावकर, शेकापचे नेते भाई जयंतराव पाटील, सपाचे नेते रईस शेख आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *