शिवसेना कोणाची, लेखी युक्तिवाद पूर्ण
मुंबई,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षानाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह आमचं असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भातील कागदपत्रे व लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यानुसार आज दोन्ही गटांकडून लेखा युक्तीवाद सादर करण्यात आले आहेत
ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली. आम्ही तीन लाख प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. तसेच २० लाख प्राथमिक सदस्यत्वाचे पुरावे दिले आहेत. त्यानुसार शिंदे गटाने काय पुरावे दिले, याची पडताडणी करा आणि आम्हाला न्याय द्या, अशी मागणी आयोगापुढे केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच हा निकाल आमच्याच बाजुने लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान मूळ पक्ष आम्हीच आहोत. त्यामुळे आम्हाला पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह मिळावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपद घटनात्मक आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे जास्त आहे. बहुमत आमच्याकडे आहे”, अशी भूमिका शिंदे गटाकडून लेखी युक्तिवादातून मांडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चिन्ह देताना लोकप्रतिनिधी संख्याबळ विचारात घेतले जावे. निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे आम्ही पुराव्यांची पुर्तता केली आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावे. असा लेखी युक्तिवाद शिंदे गटाने सादर केल्याची माहिती मिळत आहे.
SL/KA/SL
30 Jan. 2023