कुस्तीपटूंचे आंदोलन मागे, ब्रिजभूषण पायउतार
नवी दिल्ली,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दणका बसला आहे. तब्बल सात तासाच्या बैठकीनंतर अखेर ब्रिजभूषण शरण सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चौकशीपूर्ण होईपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून दूर ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा मोठा निर्णय जाहीर केला. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांना मोठा झटका मानला जात आहे. क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयानंतर कुस्तीपटूंनी आपलं धरणं आंदोलनही मागे घेतलं आहे.
दरम्यान, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान, आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याचं आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिलं. या समितीतील सदस्यांची नावं शनिवारी जाहीर करण्यात येतील, असंही ठाकूर म्हणाले. येत्या ४ आठवड्यांत ही समिती आपली चौकशी पूर्ण करेल आणि त्याचा अहवाल सादर करेल, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
दरम्यान, आंदोलकांनी आरोप केलेले कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशमधील भाजपाचे एक प्रभावी नेते आहेत. सहा वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. याआधीही ब्रिजभूषण सिंह एका व्हिडीओमध्ये वादात सापडले होते. त्यात २०२१मध्ये एका शिबिरादरम्यान एका कुस्तीपटूला थोबाडीत मारल्याचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
21 Jan. 2023