खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन
मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज प्रख्यात हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे आता भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त १५ जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याच बरोबर जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी तीन लाख रुपये देणार असल्याचेही जाहीर केले.
आज महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन २०२०- २१ व सन २०२१-२२ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कारांचे वितरण आज येथे शानदार सोहळ्यात करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले,” कै. खाशाबा जाधव हे सर्वांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिन दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. क्रीडा पुरस्काराच्या रकमांमध्ये वाढ करावी ही गेली काही वर्षे मागणी होती त्यानुसार आम्ही जीवनगौरव पुरस्कारासाठी ३ लाख रुपये ऐवजी ५ लाख रुपये तर अन्य क्रीडा पुरस्कारांसाठी १ लाख रुपयाला आयोजित ३ लाख रुपये देण्याचे जाहीर करीत आहोत”. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवावा या दृष्टीने महाराष्ट्राच्या खेळाडूंना आम्ही काही कमी पडून देणार नाही आमचे शासन सदैव त्यांच्या पाठीशी असणार आहे.
SL/KA/SL
29 Aug 2023